राजू शेट्टींनीही बुलडाण्यात दिली बंद अयशस्वी झाल्याची कबुली!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला महाराष्ट्र बंद हा लखीमपूरमध्ये झालेल्या शेतकरी हिंसेच्या विरोधात होता म्हणून आपण पाठिंबा दिला होता. बंद पुकारताना त्यांनी शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांशी व घटक पक्षांशी चर्चा केली नाही. बंदची बातमी वर्तमानपत्रातून वाचली. मात्र बंद कशासाठी आहे हे सांगण्यात आघाडीचे नेते, कार्यकर्ते कमी पडले. राष्ट्रवादी काँग्रेस, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला महाराष्ट्र बंद हा लखीमपूरमध्ये झालेल्या शेतकरी हिंसेच्या विरोधात होता म्हणून आपण पाठिंबा दिला होता. बंद पुकारताना त्‍यांनी शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांशी व घटक पक्षांशी चर्चा केली नाही. बंदची बातमी वर्तमानपत्रातून वाचली. मात्र बंद कशासाठी आहे हे सांगण्यात आघाडीचे नेते, कार्यकर्ते कमी पडले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे किती नेते रस्त्यावर उतरले? लोकांना नीट समजावून सांगितले असते तर बंद यशस्वी झाला असता, असे म्हणत अप्रत्यक्षरीत्या बंद अयशस्वी झाला असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.

दिवंगत राणा चंदन यांच्या निवासस्थानी सांत्वन भेटीसाठी ते आज, १२ ऑक्टोबरला बुलडाण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या संकटात, दुःखात लोक सहभागी होतातच. लोक तेवढे असहिष्णू नाहीत. मात्र बंद कशासाठी होता हेच लोकांना कळले नाही. बंद पुकारण्यापूर्वी नेते, शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याचे औचित्य आघाडी सरकारने दाखवले नाही, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारवर तुम्ही नाराज आहात का, या प्रश्नावर ते म्हणाले, की राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या शिवारात आक्रोश आहे. जोपर्यंत आक्रोश संपत नाही तोपर्यंत माझे समाधान होत नाही. सध्या मी कुणावरच खुश नाही, असे राजू शेट्टी म्हणाले. पीक विमा कंपन्यांनी तातडीने २५ टक्के ॲडव्हान्स नुकसान भरपाई द्यावी. राज्य आणि केंद्र सरकारने सुद्धा भरीव मदत द्यावी. केंद्र सरकारला यातून पळ काढता येणार नाही, असेही राजू शेट्टी म्हणाले.