राजकारणात काय बी होऊ शकतं… जऊळकाच्‍या महिला सरपंचावर अविश्वास आणणारे उपसरपंचच ठरले अपात्र!

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जऊळका (ता. सिंदखेड राजा) येथील महिला सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्याविरुद्ध चालू महिन्यात अविश्वास ठराव दाखल करणारे उपसरपंच नामदेव बुधवत यांना आज, २९ सप्टेंबरला अप्पर जिल्हाधिकारी यांनी एका आदेशाने अपात्र घोषित केले आहे. त्यांचे सदस्यत्व आणि उपसरपंचपदही रद्द केले आहे. उपसरपंच नामदेव म्हसाजी बुधवत यांनी ग्रामपंचायत …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जऊळका (ता. सिंदखेड राजा) येथील महिला सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्‍याविरुद्ध चालू महिन्यात अविश्वास ठराव दाखल करणारे उपसरपंच नामदेव बुधवत यांना आज, २९ सप्टेंबरला अप्पर जिल्हाधिकारी यांनी एका आदेशाने अपात्र घोषित केले आहे. त्यांचे सदस्यत्व आणि उपसरपंचपदही रद्द केले आहे.

उपसरपंच नामदेव म्हसाजी बुधवत यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढताना संडास बांधल्याचे बोगस कागदपत्रे लावून निवडणूक लढविली होती. निवडून आल्यानंतर त्यांनी ई-क्लास जमिनीवर शासनाचा रेडीमेड संडास उभा करून बनवाबनवी केली आणि दिशाभूल केली, अशी तक्रार विजय नागरे यांनी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे दाखल केली.

पटवारी, मंडळ अधिकारी यांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी चौकशी करून अहवाल दिला. त्यावरून तत्कालिन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी उपसरपंच बुधवत यांना अपात्र घोषित केले. या निर्णयाला आवाहन देत उपायुक्त अमरावती यांच्याकडे प्रकरण दाखल करून बुधवत यांनी स्टे मिळविला होता. ते प्रकरण उपायुक्तांकडे दोन वर्षे चालले व पुन्‍हा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे फेरचौकशीसाठी आले. त्यानुसार दोन्हींकडील वकिलांचे म्हणणे ऐकून घेत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी उपसरपंच बुधवत यांनी अतिक्रमण केले असून, त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असा निर्णय आज दिला.

कामे करा, राजकारण बस झालं…
सरपंच द्वारकाबाई सांगळे यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाला ग्रामस्‍थांनी केराची टोपली दाखवली. आता ठराव आणणारेच उपसरपंच पायउतार झाले. त्‍यामुळे आता तरी गावात राजकारणाला बाजूला ठेवून विकासाची कामे व्‍हायला हवीत, अशी अपेक्षा ग्रामस्‍थ बाळगून आहेत. एकमेकांची जिरविण्यात गाव अक्षरशः भकास झाले असून, कवडीचीही कामे झाली नसल्याचा संताप ग्रामस्‍थांनी व्‍यक्‍त केला आहे.