मुख्यमंत्र्यांना भेटून करणार गायकवाडांविरुद्ध कारवाईची मागणी ः प्रा. जोगेंद्र कवाडेंची बुलडाण्यात माहिती
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमदार संजय गायकवाड यांनी सामाजिक दुही माजवणारे वक्तव्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून गायकवाडांविरुद्ध कडक कारवाईची मागणी करणार आहे, अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी बुलडाण्यात पत्रपरिषदेत दिली.
कवाडे म्हणाले, की खामगाव तालुक्यातील चितोडा गावास अनेकांनी भेट दिली. मात्र आम्ही भेट देण्यास निघालो असता पोलिसांनी नोटीस बजावली. यावरून पोलीस प्रशासन कसे काम करत आहे हे स्पष्ट होते. दोन कुटुंबातील हा वाद आहे हे सर्वश्रुत आहे. मात्र आ. गायकवाड यांच्या सांगण्यावरून दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले ही कायद्याची पायमल्ली आहे. आमदार असल्याने गायकवाडांनी कायद्याचा आदर करणे कर्तव्य ठरते. मात्र ते स्वतःच कायदे पायदळी तुडवत आहेत. त्यामुळे त्यांना कायदेमंडळात राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही. सरकार गोरगरीबांच्या पाठिशी असले पाहिजेत. मात्र इथे सरकार आरोपीला पाठिशी घालत असल्याचे दिसते.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आम्ही ५० हजारांचा मोर्चा काढू, असा इशारा यावेळी कवाडे यांनी दिला. आ. गायकवाड यांच्याविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे यावेळी सांगण्यात आले. खासदार प्रतापराव जाधव हे दलितांजवळ पैसा कोठून आला असे वक्तव्य करतात. जाधव हे श्रीमंत खासदारांच्या यादीत आहेत. त्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजेत. याबाबत ईडीकडे मागणी करणार असल्याचे प्रा. कवाडे म्हणाले. जाधवांची भूमिका पक्षपाती असल्याचा आरोप त्यांनी केला.