मुख्यमंत्र्यांच्‍या आवाहनाला सत्ताधारी पक्षाच्‍याच आमदाराकडून हरताळ!; आ. एकडे, नगराध्यक्ष रावळ यांच्‍यासह २१ जणांविरुद्ध मलकापूरमध्ये गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ज्यांच्या खांद्यावर नियम पाळून घेण्याची जबाबदारी असते, ते नियम भंग करताना मलकापूरमध्ये दिसले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविषयक नियम पाळा म्हणून सांगून सांगून थकले पण सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराने या नियमांचा भंग करून मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फासला. कोरोनाविषयक नियमांचे भान विसरून गर्दी जमवल्या प्रकरणी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे, नगराध्यक्ष …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ज्‍यांच्‍या खांद्यावर नियम पाळून घेण्याची जबाबदारी असते, ते नियम भंग करताना मलकापूरमध्ये दिसले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविषयक नियम पाळा म्‍हणून सांगून सांगून थकले पण सत्ताधारी पक्षाच्‍याच आमदाराने या नियमांचा भंग करून मुख्यमंत्र्यांच्‍या आवाहनाला हरताळ फासला. कोरोनाविषयक नियमांचे भान विसरून गर्दी जमवल्या प्रकरणी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे, नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्यासह २१ जणांविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात काल, १५ जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्‍यामुळे विरोधकांना टीका करण्याची आयतीची संधी मिळाली आहे.

आमदार राजेश एकडे यांचा १४ जुलैला वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. किमान लोकप्रतिनिधींनी तरी सध्याच्‍या परिस्‍थितीचे भान बाळगण्याची गरज असते. मात्र मलकापूर शहरातील पारपेठ भागातील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाच्या भूमिपूजनाला जी गर्दी जमली ती पाहून अनेकांनी नाराजी व्‍यक्‍त केली. या गर्दीचे व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काल, १५ जुलैला रात्री आमदार राजेश एकडे, नगराध्यक्ष हरीश रावळ, उपनगराध्यक्ष रशीद खाँ जमादार यांच्यासह २१ जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनीच या प्रकरणात पुढे येऊन तक्रार दाखल केली आहे.

वाढदिवस अन्‌ गुन्हे…
वाढदिवस आणि गुन्हे हे समीकरण आता मलकापूरवासीयांसाठी काही नवीन नाही. यापूर्वीही उपनगराध्यक्ष रशीद खाँ जमादार यांच्या वाढदिवसाला गर्दी जमली होती. तलवारींचा नंगानाच झाला होता. तेव्हाही गुन्हे दाखल झाले होते. तेव्हाही पारपेठ भागातच कार्यक्रम होता आणि आताही पारपेठ भागातच.