"मी पुन्हा आलो..."! महाराष्ट्रात आता "देवेंद्रराज"! भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड; आज करणार सत्ता स्थापनेचा दावा;
उद्या आझाद मैदानावर शपथविधी सोहळा; बुलडाणा जिल्ह्यातून कुणाचा लागणार नंबर?
Dec 4, 2024, 13:33 IST
मुंबई(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आता तब्बल दहा दिवसानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचे उत्तर मिळाले आहे. "मी पुन्हा येईन ..पुन्हा येईन"असे म्हणणारे देवेंद्र फडणवीसच आता पुढील पाच वर्षासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील हे आता स्पष्ट झाली आहे. भाजपने पाठवलेल्या केंद्रीय निरीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली, यात गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.. आज देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असून उद्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत..
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली होती. काही काळ एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा देखील राज्यात सुरू होत्या. मात्र आता राजकीय परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात भाजपला यश आले असून मुख्यमंत्रीपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा उद्या,५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह देशभरातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातून कोण?
बुलडाणा जिल्ह्यातील सात पैकी सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार विजयी झालेले आहेत. यात मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती सर्वात सिनियर आहेत. जळगाव जामोद चे आमदार संजय कुटे पाचव्यांदा तर आकाश फुंडकर तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील या दुसऱ्यांना आमदार झाले आहेत. शिवाय विदर्भातून भाजपच्या त्या एकमेव महिला आमदार आहेत. सिंदखेडराजातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मनोज कायंदे पहिल्यांदा आमदार झाले आहेत, बुलडाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे संजय गायकवाड आमदार झालेले आहेत. या सहाजणांपैकी मंत्रिमंडळात कुणाची वळणी लागते? याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे...