माणसा परिस बाया चांगल्या, मतदान करून झाल्या मोकळ्या! तिसर्या टप्प्यात मतदानात आघाडीवर!; साडेचार लाख मतदारांनी बजावला हक्क!
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 498 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदानाच्या तिसर्या टप्प्यात अजब गजब चित्र पहावयास मिळाले! या टप्प्या अखेरीस महिलांनी बाप्यांना मतदानात मागे टाकत आघाडी मिळवली. तब्बल 8 तालुक्यात महिलांच्या मतदानाची टक्केवारी जास्त असतानाच 4 तालुक्यांतील अर्ध्याअधिक महिलांनी मतदान करून टाकल्याचे सुखद तितकेच मजेदार चित्र आहे.
दुपारी 1ः30 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 4 लाख 39 हजार 546 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 2 लाख 24 हजार 555 ( 47 टक्के) आया, बहिणी, लेकींचा समावेश होता. यातुलनेत 2 लाख 14 हजार 991 ( 43.62 टक्के) पुरुष मतदार केंद्रापर्यंत फिरकले. सकाळच्या दोन टप्प्यांत (सकाळी 7ः30 ते 11ः30 वाजेदरम्यान) महिला मतदार 2 टक्क्यांनी मागे होत्या. मात्र यानंतरच्या 2 तासांत महिलांनी हिरीरीने मतदान करत तब्बल 8 तालुक्यांत पुरुषांना मागे टाकले. चिखली 51.30 टक्के, देऊळगाव राजा 53.25 टक्के, मलकापूर 54.48 टक्के, नांदुरा 53.80 टक्के या तालुक्यांत तर अर्ध्याअधिक महिलांनी मतदान उरकून घेतलय! ही आघाडी किती टप्प्यात कायम राहते हे पाहणे मजेदार ठरणार आहे.
मतदानावर खाकीची करडी नजर!
मतदान सुरळित पार पाडण्यासाठी व यादरम्यान कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस विभागाकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्ह्यात 170 पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय 2 हजार 200 पोलीस तैनात करण्यात आले असून, त्यांना 1008 होमगार्डचे सहकार्य मिळत आहे. याचबरोबर राज्य राखीव पोलीस दल व आरसीपीच्या 7 तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. राजकीय व सामाजीकदृष्ट्या संवेदनशील गावात अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. या गावांवर व संवेदनशील मतदान केंद्रावर प्रशासन देखील करडी नजर ठेवून आहे.