महाब्रेकिंग! तब्बल 8 महिन्यांनंतर भरणार ग्रामसभा, 870 ग्रामपंचायत क्षेत्रातील लाखो रहिवाशांसाठी खुशखबर
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायतीसाठी बंधनकारक असलेल्या व कोरोनामुळे तब्बल 8 महिन्यांपासून मनाई असलेल्या ग्रामसभा आयोजित करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या व सरपंच, सदस्यांसह ग्रामसेवकांवर जनतेचा अंकुश असलेल्या ग्रामसभांनी 870 ग्रामपंचायती पुन्हा गजबजणार आहे. नुकतेच आपल्या आवडीचे सदस्य निवडणार्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांसाठी ही मोठी दिलासादायक खूषखबर ठरणार आहे.
गत वर्षी 22 मार्चपासून लॉकडाऊन लावण्यात आल्यावर विविध क्षेत्रांपासून ते निवडणुकांवर बंधने आलीत. सरत्या वर्षात कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यावर विविध टप्प्यांत विविध क्षेत्र अनलॉक करण्यात आले. यामुळे नुकतेच ग्रामीण मंत्रालयाच्या निवडणुका पार पडल्या. या पाठोपाठ ग्राम विकास मंत्रालयाने ग्रामसभांवरील निर्बंध काढून टाकत त्या आयोजित करण्याचा मार्ग मोकळा केला. उप सचिव एकनाथ गागरे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले. मागील 12 मे 2020 रोजीच्या परिपत्रकाद्वारे पुढील आदेशपर्यंत ग्रामसभा घेण्यास स्थगिती देण्यात आली होती. आता ती हटविण्यात आली असली तरी कोरोना विषयक नियमांचे पालन करूनच आयोजन करावे लागणार आहे. यामुळे नजीकच्या काळात आयोजित ग्रामसभांचा सॅनिटायझरचा दर्प, चेहर्यांना मास्क व दो गज दुरी असा मजेदार थाट राहणार आहे.
…तर सरपंच, ग्रामसेवक विरुद्ध कारवाई
दरम्यान, पंचायत राज पद्धतीत ग्रामसभांचे विशेष महत्त्व आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारावर, गैरव्यवहारांना चाप लावण्याचे काम या माध्यमाने होते. गावाच्या विकास आराखड्यावर देखील सभेत चर्चा होते. आर्थिक वर्षात किमान 4 सभा लावणे बंधनकारक असून, यात टाळाटाळ करणार्या सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक विरुद्ध कार्यवाही करण्याची तरतूद आहे.