भिरभिरत्या पंख्याला मारला बुक्का!, भाऊंच्‍या अनाठायी स्‍टंटबाजीमुळे स्वतःसोबत कार्यकर्त्यांचाही काही क्षण जीव धोक्‍यात!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पदस्थ व्यक्तीचे राहणे, वागणे खरेतर मार्गदर्शक असेच असावे… पण काही काही नेते त्याला अपवाद ठरतात. ते त्यांच्या कृतीने नक्की काय साध्य करू पाहतात हेही कळेनासे होते. उंद्रीत (ता. चिखली) घडलेला प्रकार नुसता धक्कादायकच नाही तर स्वतःच्या जिवासोबतच व्यासपीठावर आणि खाली बसलेल्या कार्यकर्त्यांसाठीही धोकादायक होता, अशी टीका आता …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पदस्‍थ व्‍यक्‍तीचे राहणे, वागणे खरेतर मार्गदर्शक असेच असावे… पण काही काही नेते त्‍याला अपवाद ठरतात. ते त्‍यांच्‍या कृतीने नक्‍की काय साध्य करू पाहतात हेही कळेनासे होते. उंद्रीत (ता. चिखली) घडलेला प्रकार नुसता धक्कादायकच नाही तर स्वतःच्‍या जिवासोबतच व्यासपीठावर आणि खाली बसलेल्या कार्यकर्त्यांसाठीही धोकादायक होता, अशी टीका आता होत आहे. “कार्यकर्त्यांचे प्रेम सोबत असताना पंख्याने काय होणार’ असा डायलॉग मारत माजी आमदार तथा काँग्रेसचे नवनियुक्‍त जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केलेली स्‍टंटबाजी सध्या जिल्हाभरात चर्चेला आली आहे. “भाऊं’नी चक्‍क वेगात फिरणाऱ्या पंख्यालाच बुक्का मारत थांबवला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, टीकेचे कारण ठरत आहे.

विरोधानंतरही जिल्हाध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती मिळाल्याने राहुल बोंद्रे सध्या जोशात आहेत. मात्र जोश जास्त असला तर कधी कधी होश राहत नाही, असाच (अनाठायी जोशाचा) प्रत्यय नुकतेच पार पडलेल्या पक्षाच्या कार्यक्रमात आला. ३१ ऑगस्ट रोजी तालुका युवक काँग्रेस, उंद्री सरपंच भाई प्रदीप अंभोरे व सर्व आघाड्यांच्या वतीने त्यादिवशी शाखा उद्‌घाटन व सत्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यादिवशी कमीअधिक २६ शाखांचे उद्‌घाटन करण्यात आल्याने अध्यक्ष तसेही उत्साहात व जोशात होते.

समारोपीय कार्यक्रम संध्याकाळी उंद्री येथील एका कॉम्प्लेक्समधील सभागृहात पार पडला. प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती जमाती आघाडीचे उपाध्यक्ष प्रदीप अंभोरे यांचे भाषण झाल्यावर राहुल बोंद्रे भाषणासाठी उठले. यावेळी व्यासपीठावरील छत ठेंगणे असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना काळजीने दक्षता घेऊन खाली येण्यास सूचविले. यावर मात्र अध्यक्ष बोंद्रे यांनी उजव्या हाताच्या बुक्क्याने भिरभिरणाऱ्या पंख्याला पंच मारला! कार्यकर्त्यांचे प्रेम सोबत असताना पंख्याने काय होणार, असा डायलॉग मारत ते भाषणासाठी खाली उतरले. यामुळे जोरात असणारा पंखा काही वेळ थबकल्यावर पुन्हा सुरू झाला. मात्र उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या काळजाचे पाणी झाले होते. सुदैवाने काही झाले नाही. मात्र यामुळे हाताला गंभीर इजा झाली असती किंवा इतरांना दुखापत झाली असती याचे भानही अध्यक्षपद सांभाळणाऱ्या व माजी आमदार असणाऱ्या नेत्याने ठेवू नये, याबद्दल टीका होत आहे.