बुलडाणा पालिकेच्या सभापतींची बिनविरोध निवड! सत्ताधारी ‘एसआरबीसी’ आघाडीचे वर्चस्व कायम!! घटक पक्षांना मिळाला वाटा
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पंचवार्षिक निवडणूक तोंडावर आली असताना आज 21 जानेवारीला झालेल्या विषय समिती सभापती व स्थायी समितीची बिनविरोध निवड झाली. यामुळे पालिकेतील एसआरबीसी अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी, भारिप, काँग्रेस आघाडीचे वर्चस्व कायम राहिले आहे. यामुळे एरवी दीर्घ काळ चालणारी विशेष सभा दुपारी 2 वाजताच्या ठोक्यालाच संपली!
पीठासीन अधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनात व प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या उपस्थितीत आज सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात विशेष सभेला प्रारंभ झाला. आघाडीच्या बहुमतामुळे ही निवड प्रसाशकीय औपचारिकताच ठरली! पीठासीन अधिकार्यांनी बिनविरोध सभापतींच्या नावाची घोषणा केली. बांधकाम सभापती पदी मो. अफसर मो. सरवर (काँग्रेस), महिला बाल कल्याण समिती सभापतीपदी राणीबी शेख लाल (राष्ट्रवादी काँग्रेस), शिक्षण सभापती गौसिया बी शेख सत्तार (राष्ट्रवादी), पाणीपुरवठा सभापती पदी कोमल बेंडवाल, आरोग्य सभापती पदी आशिष जाधव (शिवसेना) यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्ष विजय जायभाये, नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष तर पालिकेच्या अध्यक्ष नजमुन्नीसा बेगम मो. सज्जाद या स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्षा आहेत. स्थायी समितीत सेनेचे नगरसेवक दीपक सोनुने, उमेश कापुरे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. कोमल बेंडवाल भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या असल्या तरी त्यांनी नुकतेच सेनेत प्रवेश घेतला आहे. सभेच्या आयोजनासाठी एकनाथ गोरे, सुधीर दलाल यांनी सहकार्य केले.