बलात्काराचा आरोपी मोकाट, हिंदूंवर टीका करणारा शार्जील उस्मानी मोकाट; राणे प्रकरणावरून श्वेताताई महालेंची राज्य सरकारवर टीका

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ज्या भाषेसाठी ठाकरे सरकार केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्यावर कारवाई करत आहे, तशीच भाषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी वापरली होती. स्वतःच्या भोंगळ कारभारावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरी उचापत्या करणे थांबवा आणि जनतेचे प्रश्न सोडवा, असा घणाघात चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी आघाडी सरकारवर केला आहे. नारायण …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ज्या भाषेसाठी ठाकरे सरकार केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्यावर कारवाई करत आहे, तशीच भाषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी वापरली होती. स्वतःच्या भोंगळ कारभारावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरी उचापत्या करणे थांबवा आणि जनतेचे प्रश्न सोडवा, असा घणाघात चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी आघाडी सरकारवर केला आहे.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यभर शिवसैनिक संतप्त आहेत. नारायण राणेंना नाशिक पोलिसांनी अटक देखील केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल ट्विटरच्या माध्यमातून आमदार महाले यांनी आघाडी सरकारचा समाचार घेतला आहे.

राज्यात बलात्काराचा आरोपी मोकाट, युवतीच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप असलेला माजी मंत्री मोकाट, राज्यात येऊन हिंदूंना अपशब्द वापरणारा शार्जील उस्मानी मोकाट आणि केंद्रीय मंत्र्यांनी तुमच्याच भाषेत केलेली टीका सहन झाली नाही म्हणून त्यांना अटक… वाह रेऽ आघाडी सरकार, असे ट्विट आमदार श्वेताताई महाले यांनी केले आहे. आणखी एका ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, की “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या देहबोलीवर, कुटुंबियांवर किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली होती पण त्यांनी पराकोटीचा संयम दाखवला. मुख्यमंत्री पदावर बसण्याची नुसती हौस असून भागत नाही… अंगी क्षमता, संयम आणि समंजसपणा असावा लागतो, अशी टीकाही त्‍यांनी केली आहे.