फोटू जमा न केल्यास मतदार यादीतून ‘त्यांचा’ पत्ता कट! 23 मार्चनंतर मतदानाला मुकणार
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मतदार यादीत फोटो नसलेल्या बुलडाणा तालुक्यातील मतदारांनी आजवरप्रमाणे आताही हलगर्जीपणा केलाच तर 23 मार्चनंतर मतदार यादीतून त्यांचे नावच काढून टाकण्यात येणार हाय! परिणामी पुढील लहानमोठ्या निवडणुकीत ते मतदान व मानापानाला देखील मुकणार हे स्पष्ट आहे.
मागील 15 जानेवारी 2021 रोजी 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित बुलडाणा तालुक्यातील मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. या याद्यांमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांचे फोटो नाहीत. या शेकडो मतदारांना वारंवार सूचित करूनही त्यांनी संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर( बीएलओ) यांच्याकडे त्यांचे फोटो दिले नाही, हे बीएलओ त्यांच्या घरी चकरा मारू मारू कंटाळले पण तरीही त्यांनी फोटू दिलेच नाहीत. यामुळे आयोगाच्या निर्देशांनुसार त्यांना आता 23 मार्च 2021 ही अंतिम मुदत देण्यात आली. या महाभागांनी आतातरी या मुदतीत आपले फोटो बीएलओ कडे जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे , आता या मुदतीत देखील त्यांनी ही तसदी घेतली नाही तर मात्र त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे, तेव्हा अशा बेजवाबदार मतदारांनो सावधान….