निवडणूक जिल्हा परिषद गटाची, पण 4 आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा लागलीये पणाला!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विविध कारणांमुळे रिक्त असलेल्या उंद्री निमगाव जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक पुढील महिन्यात लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुहूर्त ठरला नसला तरी ही लढत काट्याची आणि भाजप व महाविकास आघाडीमधील जंगी मुकाबला ठरणार हे आताच स्पष्ट झाले आहे. तसेच तो 4 आजी- माजी आमदारांची अप्रत्यक्ष का होईना …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विविध कारणांमुळे रिक्त असलेल्या उंद्री निमगाव जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक पुढील महिन्यात लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुहूर्त ठरला नसला तरी ही लढत काट्याची आणि भाजप व महाविकास आघाडीमधील जंगी मुकाबला ठरणार हे आताच स्पष्ट झाले आहे. तसेच तो 4 आजी- माजी आमदारांची अप्रत्यक्ष का होईना कसोटी ठरणार आहे.
चिखली तालुक्यातील उंद्री जिल्हा परिषद मतदार गटाचे प्रतिनिधित्व आमदार श्‍वेता महाले पाटील यांनी केले आहे. त्यांनी 2019 मध्ये झालेली आमदारकीची निवडणूक जिंकल्याने जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. दुसरीकडे नांदुरा तालुक्यातील निमगाव जिल्हा परिषद गटातून मधुकर वडोदे निवडून आले होते. त्यांचे अकाली निधन झाल्याने ती जागा रिक्त झाली. आता या दोन्ही जागांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे. हा कार्यक्रम लक्षात घेता मार्च महिन्यात पोटनिवडणूक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आमदार झाल्यावर चिखली मतदारसंघात विकासाचा झंझावात आणून लोकाभिमुख राजकारण करणार्‍या श्‍वेताताई महाले यांनी अल्पावधीतच विविध योजनांतून लाखोंचा निधी आणून उंद्री जिल्हा परिषद गट मॉडेल म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे हा मतदारसंघ त्यांच्यासाठी खास आहे. त्यामुळे त्यांना तेथील निवडणूक जिंकणे आवश्यकच ठरते. याउलट माजी आमदार राहुल बोंद्रे यांना ही निवडणूक जिंकणे जास्तच आवश्यक ठरते. त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ही लढत निर्णायक ठरली आहे. आता सोबतीला राष्ट्रवादी व शिवसेना असण्याची शक्यता असल्याने त्यांना खात्री असली तरी उंद्रीमध्ये विजय सहज नाही. या आरपारच्या लढतीसाठी भाजप व आघाडीचा उमेदवार कोण यावर देखील लढतीचा निकाल ठरणार आहे.
दुसरीकडे मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांच्यासमोरही अशीच आव्हाने आहेत. विधानसभा लढतीत पराभूत झाल्याने माजी आमदार चैनसुख संचेती देखील जखमी शेर ठरले आहेत. कोणत्याही स्थितीत निमगाव जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवार निवडून आणणे त्यांना काळाची गरज ठरली आहे. याउलट जायंट किलर ठरलेले आमदार एकडे यांना निमगाव राखणे आवश्यक ठरले आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक संभाव्य उमेदवार, भाजप, आघाडी यांच्यापेक्षा या 4 आजी- माजी आमदारांची सत्व परीक्षा ठरणार आहे. हे मिनी युद्धाचा मुहूर्त घोषित होण्यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
असा आहे मतदार यादी कार्यक्रम
घोषित कार्यक्रमानुसार15 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी वापरण्यात येणार आहे. ही मतदार यादी 18 फेब्रुवारीला प्रसिद्ध करून 26 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. 5 मार्च रोजी ती अधिप्रमाणित करण्यात येणार असून, 10 मार्चला मतदान केंद्र यादी व केंद्रनिहाय मतदार याद्या निर्धारित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी 5 फेब्रुवारीला यासंदर्भात आदेश जारी केले होते.