नितीन गडकरींवर मेहकरमधून दबाव!; उपोषण सोडविण्यासाठी येणार का?, आंदोलनाचा चौथा दिवस उजाडल्‍याने शहरात चर्चा सुरू

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर दबाव येत आहे. अर्थात हा दबाव “दिल्ली’, “नागपूर’मधून नाही तर चक्क मेहकरमधून येतोय. कारण विशेष आहे. शेगाव- पंढरपूर पालखी मार्गाचे काम मेहकर शहरात अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, या कामाची उच्चस्तरीय चौकशी आणि पाहणी करण्यासाठी स्वतः गडकरींनी यावे. जोपर्यंत ते मेहकर शहरात येत नाहीत तोपर्यंत …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍यावर दबाव येत आहे. अर्थात हा दबाव “दिल्ली’, “नागपूर’मधून नाही तर चक्‍क मेहकरमधून येतोय. कारण विशेष आहे. शेगाव- पंढरपूर पालखी मार्गाचे काम मेहकर शहरात अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, या कामाची उच्चस्‍तरीय चौकशी आणि पाहणी करण्यासाठी स्वतः गडकरींनी यावे. जोपर्यंत ते मेहकर शहरात येत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे मेहकर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय पवार यांनी म्‍हटले आहे. “बुलडाणा लाइव्ह’कडे त्‍यांनी आपल्या या मागणीचा पुनरूच्चार आज, ४ सप्‍टेंबरला आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही केला.

शेगाव- पंढरपूर पालखी महामार्गाचे काम मेहकर शहरात निकृष्ट झाले. इतर सर्वच ठिकाणी रस्ता दुभाजक असताना मेहकर शहरात रस्ता दुभाजक बनवण्यात आले नाही. रस्ता अरूंद करण्यात आला. रस्त्याला आताच तडे जात आहेत. मेहकर शहरातील प्रमुख रस्ता असूनही त्याची योग्य ती काळजी घेतली जात नाही. रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे हा प्रश्न फक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच मार्गी लावू शकतात. मुख्यमंत्री आले तरी उपोषण सोडणार नाही. केवळ गडकरी हे मेहकर शहरात आल्यानंतरच उपोषण सोडणार असल्याचे पवार म्हणाले. १ सप्टेंबरपासून मेहकर शहरातील खालच्या बसस्थांनकावर ते उपोषणाला बसले आहेत.
अनेकांचे हात ओले…
मेहकर शहरातून हा महामार्ग नेताना नियमांना इतका फाटा देण्यात आला आहे की चौकशी झाली तर गैरव्यवहार समोर येण्याची शक्‍यता आहे. यात लोकप्रतिनिधींचीही भूमिका संशयास्पद अाहे. त्‍यामुळेच त्‍यांचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष गेले नसल्याची चर्चा मेहकर शहरात आहे.