नांदुराच्या नगराध्यक्षा सौ. रजनीताई जवरे भाजपातून शिवसेनेत दाखल!
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुराच्या नगराध्यक्षा सौ. रजनीताई अनिल जवरे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अखेर शिवबंधन बांधले. मुंबई येथील वर्षा बंगल्यावर काल, 2 एप्रिल रोजी रात्री 9.30 ला त्यांनी भाजपातून शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे शहरात खळबळ उडाली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी जनतेशी ऑनलाइन संवाद साधला होता. त्यानंतर लगेच रजनीताई अनिल जवरे व सामाजिक कार्यकर्ते अनिल जवरे यांनी त्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हजर होते. देऊळगाव राजानंतर भाजपातून शिवसेनेत जाणाऱ्या या दुसऱ्या नगराध्यक्षा ठरल्या आहेत. पंधरा दिवसांतच दोन नगराध्यक्षा भाजपातून शिवसेनेत गेल्याने हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.