दारूची दुकाने उघडता, बार उघडता मग मंदिरे का बंद? भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचा सवाल; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र धार्मिक स्थळे अजूनही बंद आहेत.सरकार मंदिरांना का परवानगी देत नाही, असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या अाध्यत्मिक आघाडीने राज्य सरकारला केला आहे. राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करावी, या मागणीसाठी आज, १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र धार्मिक स्थळे अजूनही बंद आहेत.सरकार मंदिरांना का परवानगी देत नाही, असा सवाल भारतीय जनता पक्षाच्‍या अाध्यत्मिक आघाडीने राज्य सरकारला केला आहे. राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करावी, या मागणीसाठी आज, १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. टाळ, मृदंग वाजवत व भजनाच्या गजरात हे आंदोलन झाले. नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. अनेक जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा शून्यापेक्षा कमी आहे. देशात रेल्वे सेवा सुरू आहे. राज्यात बार व दारूची दुकानेही सुरू आहेत. इतर अनेक व्यवसाय उद्योगांना परवानगी देण्यात आली असताना मंदिरे बंद का? बुद्धविहार, मशिद, चर्च बंद का, असा सवाल निवेदनात केला आहे. भाविकांसाठी श्रावण महिना श्रद्धेचा विषय असतो. त्यामुळे नेमक्या याच महिन्यात देवदर्शन दुर्लभ होत आहे. कीर्तने ,प्रवचन बंद आहेत. सरकारने धार्मिक स्थळांना नियमांचे पालन करून सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनात भाजपा अध्यात्मिक आघाडीचे ह.भ.प. ठोकरे महाराज, माजी आमदार तोताराम कायंदे, मेहकरच्या मंदाकिनीताई कंकाळ, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील देशमुख यांच्यासह वारकरी, कीर्तनकार उपस्थित होते.