ताई-दादांचा बुलडाण्यात एल्‍गार!; दोन आंदोलनांनी वेधले लक्ष!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आंदोलनांच्या निमित्ताने ताई-दादा बुलडाण्यात पुन्हा समोरासमोर आल्याचे दिसून आले. नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 नंतर निदर्शने केली, तर त्याआधी आमदार श्वेताताई महाले यांनी तरुणांना रोजगार द्या, असे म्हणत भाजयुमोच्या आंदोलनात जोश भरला. दोन्ही आंदोलनांची चर्चा झाली, ती कट्टर विरोधक असलेल्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आंदोलनांच्‍या निमित्ताने ताई-दादा बुलडाण्यात पुन्‍हा समोरासमोर आल्याचे दिसून आले. नवीन कृषी कायद्यांच्‍या विरोधात काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 नंतर निदर्शने केली, तर त्‍याआधी आमदार श्वेताताई महाले यांनी तरुणांना रोजगार द्या, असे म्‍हणत भाजयुमोच्‍या आंदोलनात जोश भरला. दोन्‍ही आंदोलनांची चर्चा झाली, ती कट्टर विरोधक असलेल्या या दोन नेत्‍यांमुळे.

केंद्र सरकारच्‍या तीन नव्‍या कृषी कायद्यांच्‍या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस व जिल्हा किसान काँग्रेसतर्फे दुपारी 12 ते 3 दरम्‍यान धरणे आंदोलन करण्यात आले. दिल्लीच्या सीमेवर 200 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून हे आंदोलन झाले. केंद्र शासनाने आणलेले शेतकरी कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत. एक देश बाजारपेठ कायदा, करार शेती कायदा व जीवनावश्यक वस्तू सुधारणा कायदा 2020 असे 3 कृषी कायदे संमत करताना संसदेमध्ये कुठलीही चर्चा करण्यात आली नव्हती. हे कायदे अन्यायकारक असल्याचे सांगत दिल्लीच्या सीमेवर गेल्या 6 महिन्यांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलन काळात 350 पेक्षा शेतकरी शहीद झाले. परंतु मोदी सरकारने कृषी कायदे रद्द केले नाहीत. उलट शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी मोदी सरकारने प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. हे अन्यायकारक कायदे रद्द करण्यात यावे, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या, अशी मागणी केली. निवेदनावर आंदोलनात जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, आमदार राजेश एकडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, विजय अंभोरे, ॲड. गणेशराव पाटील, जिल्‍हा परिषद अध्यक्षा मनीषाताई पवार, सभापती ज्योती पडघान, ॲड. हरीश रावळ, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, संजय राठोड, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील, रिजवान सौदागर, दिलीप जाधव, दत्ता काकस, स्वातीताई वाकेकर, नाना देशमुख, जयश्रीताई शेळके यांच्या सह्या आहेत.

तरुणांना रोजगार द्या; “भाजयुमो’चा टाहो
राज्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे प्रमाण वाढले असून, त्‍यामुळे शासकीय जागांचा मोठा अनुशेष भरून काढावा व त्‍यांना रोजगार मिळवून न्याय द्यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी भाजपा युवा मोर्चाने एकदिवसीय धरणे आंदोलन केले. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात भाजपच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. राज्यातील गृह विभागातील 24 हजार 581, सार्वजनिक आरोग्य विभागातील 20 हजार 544, जलसंपदा विभागातील 20 हजार 873 अशी राज्यात किमान 2 लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत ही तात्काळ भरावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आमदार महाले यांच्यासह सिंधूताई तायडे, सुनील देशमुख, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, दत्ता पाटील, मंदार बाहेकर, गणेश देहाडराय, अरविंद होंडे, गौरव राठोड, गोपाल तायडे, मयूर वडाळे, जितेंद्र तायडे, अर्जुन लांडे, यश तायडे, अंकुश भालेराव, मोहन पवार, सतिश पाटील, सुभाष जगताप उपस्थित होते.