जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून मतदार नोंदणी कार्यक्रम; ५ जानेवारीला मतदार यादी होणार अंतिम

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येत्या १ नोव्हेंबरपासून मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विविध टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंती म्हणजे ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उप जिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत यांनी आज, …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येत्या १ नोव्हेंबरपासून मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विविध टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंती म्हणजे ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

उप जिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत यांनी आज, २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यापूर्वी ९ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पुनरीक्षण पूर्व कार्यक्रम राबविण्यात आला. आता पुढील टप्प्यात १ नोव्हेंबरला एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान दावे हरकती दाखल करता येणार असल्याचे “डीईओ’ सावंत यांनी सांगितले.

याच कालावधीत नवीन मतदार नोंदणी व नावात- पत्त्यामध्ये दुरुस्ती आदी कामे करण्यासाठी मतदान केंद्र स्तरावर विशेष मोहीम सुद्धा राबविण्यात येईल. हे दावे २० डिसेंबरपर्यंत निकाली काढण्याचे निर्देश असल्याचे सावंत यांनी सांगितले. शेवटच्या टप्प्यात ५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आयोगाने ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी वोटर हेल्पलाईन मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन गौरी सावंत यांनी यावेळी बोलताना केले. पत्रकार परिषदेला नायब तहसीलदार सुनील आहेर व त्यांचे सहकारी जीवन ढोले, विजय तायडे, अमोल नारखेडे, विजय बोक्से हजर होते.