जिल्हा काँग्रेसच्या स्वबळाचे “LIVE’ पोस्टमार्टम!; “नापास’ची मार्कलिस्ट अन् राजकीय स्वार्थापलिकडे न बघणाऱ्या नेत्यांची क्षमता कोण तपासणार?
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून नाना पटोले येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. नुकतेच जिल्हा दौऱ्यावर आलेले माजीमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी देखील त्यांची री ओढत स्वबळाची भाषा केली. मात्र गत लढतीत प्रामुख्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत जिल्हा काँग्रेसने काय दिवे लावले याचा आढावा या दोन्ही नेत्यांनी घेतलाच नाही की जिल्हाध्यक्षांसह अन्य नेत्यांनी नापास ची मार्कलिस्ट त्यांना दाखविलीच नाही, असा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यावर नाना पटोले यांनी अलीकडेच बुलडाणा जिल्ह्याचा दौरा केला. यानंतर काही दिवसांपूर्वीच कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी जिल्ह्याला भेट दिली. नानांनी स्वबळाचा नारा बुलंद करतानाच केलेली अनेक विधाने वादग्रस्त ठरून बुमरँगसारखी त्यांच्यावरच उलटली. मात्र त्यांच्यासह हंडोरे यांनी जिल्ह्यातील काँग्रेसची सत्य परिस्थिती अन् मागील निवडणुकांत केलेली कमकुवत कामगिरी याची माहिती घेतली नाही का? अशी शंका निर्माण झाली आहे. दिग्गज म्हणवून घेणाऱ्या व पदासाठी कधीही तयार असणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी (किरकोळ अपवाद वगळता) मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत काय दिवे लावले याचा धांडोळा नेत्यांनी घेतलाच नसावा असे वाटते. राज्य निर्मिती वा जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी असणारी व दर निवडणुकांत “मेरिट’मध्ये उत्तीर्ण होणारी काँग्रेस मिनी मंत्रालयाच्या कठीण परीक्षेत चक्क नापास झाली होती! मात्र लाल अक्षरांनी भरलेली ही गुणपत्रिका पहायची इच्छा त्यांनी दर्शविली नाही की जिल्ह्यातील नेत्यांनी दाखविलीच नाही असा मजेदार सवाल, जेमतेम पाच महिन्यांवर आलेल्या या निवडणुकानिमित्त उपस्थित झाला आहे. परिणामी नाना व हंडोरे यांचा स्वबळाचा निर्धार कशाच्या व कोणाच्या बळावर, अशी चर्चा होत आहे.
बुलडाणा लाइव्हचे हे “लाईव्ह’ पोस्टमार्टम…
गत्वेळची सुमार कामगिरी व सध्या गटबाजीने पोखरलेल्या व नेतृत्वहीन काँग्रेसचे विस्कळीत संघटन आदी घटकांमुळे हा सवाल सामोरे आलाय. २०१७ मध्ये मोदी लाट हा तकलादू बहाणा झाला. त्यानंतर व आताही कंडिशन तीच आहे, हे विशेष. गत् विधानसभेत तळ्यात मळ्यात राहणारे राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळांसारखे नेते पराभूत झाले. अँटी इंकंबन्सीमुळे मलकापूरमध्ये राजेश एकडेंच्या रूपाने पक्षाला एकमेव जागा मिळाल्याने पक्षाची अब्रू वाचली. दुसरीकडे शाळांमध्ये पास होण्यासाठी किमान ३५ टक्के गुण आवश्यक असतात, हा निकष लावला (आणि नाही लावला तरी) मागील जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस नापास झाली होती हे स्पष्ट आहे. जिल्हा परिषदेच्या ६० पैकी पक्षाला स्वबळावर जेमतेम १४ जागा मिळाल्या होत्या. याची टक्केवारी २३ अशी दयनीय आहे. १३ पंचायत समित्यांच्या एकूण १२० पैकी पक्षाला कशाबशा ३१ जागा जिंकता आल्या, याची टक्केवारीही अवघी २५ टक्के! यावर कळस म्हणजे जिल्हा परिषदेत जळगाव जामोद, शेगाव, मलकापूर, खामगाव, सिंदखेडराजा या तब्बल ५ तालुक्यात। पक्षाच्या “हातात’ भोपळा आला!
पंचायत समितीमध्येही देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, मलकापूरमध्ये पंज्याला यशाएेवजी भोपळाच आला!,राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, दिलीप सानंदा, मुखत्यारसिंह राजपूत, श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, विजय अंभोरे, संजय राठोड, संतोष आंबेकर, जयश्री शेळके, एकनाथ खर्चे, रशीद जमादार, हरीश रावळ, अनंत वानखेडे,कासम गवळी, देवानंद पवार, राजेश मापारी, नंदू बोरे, दिगंबर मवाळ, देवानंद कायंदे, नंदा कायंदे, मनोज कायंदे, प्रदीप नागरे, रामविजय बुरुंगले, ज्ञानेश्वर पाटील अशी जिल्ह्यातील नेत्यांची जम्बो यादी, या नेत्यांची एकत्रित ताकद १४ व ३१ जागांपुरतीच आहे असे म्हणावे काय? असाही एक उपप्रश्न सामोरे येतो. यामुळे नानांनी किमान जिल्ह्यात स्वबळाची भाषा करताना यापुढे नापासची ही मार्कलिस्ट व राजकीय स्वार्थापलिकडे न बघणाऱ्या नेत्यांची क्षमतादेखील तपासून बघावीच, असा निष्ठावान कार्यकर्त्यांचा सामायिक सूर आहे.