चिखलीच्‍या माजी आमदारांचा प्रकार म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या; उपनगराध्यक्ष अन्‌ आरोग्य सभापतींचा घणाघात

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली शहरातील मागास वस्तीत अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत 2 कोटी 75 लक्ष रुपये किंमतीच्या कामांना आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील, नगराध्यक्ष आणि चिखली नगरपालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रयत्नांनी मान्यता मिळालेली आहे. तरीसुद्धा या विकास कामांना माजी आमदारांच्या प्रयत्नाने मान्यता मिळाल्याचे प्रसिद्धी पत्रक माजी आमदारांनी काढून श्रेय घेण्याचा केविलवाणा …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली शहरातील मागास वस्तीत अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत 2 कोटी 75 लक्ष रुपये किंमतीच्या कामांना आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील, नगराध्यक्ष आणि चिखली नगरपालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांच्‍या प्रयत्नांनी मान्यता मिळालेली आहे. तरीसुद्धा या विकास कामांना माजी आमदारांच्या प्रयत्नाने मान्यता मिळाल्याचे प्रसिद्धी पत्रक माजी आमदारांनी काढून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असल्याचा घणाघाती आरोप उपनगराध्यक्ष सौ. वजीरा बी शे. अनिस व आरोग्य सभापती विजय नकवाल यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे केला आहे.

चिखली नगर परिषदेच्‍या 2 कोटी 75 लक्ष रुपयांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता प्रदान केली आहे. यात प्रभाग क्रमांक 2, 5, 6, 9, 11 व 12 मधील अनेक विकासकामे आहेत. यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावांच्‍या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून त्यातील सर्व त्रुटींची पूर्तता करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर केले होते. याबाबत आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी 25 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्‍या बैठकीत प्रस्तावांना मान्यता देण्याची आग्रही मागणी केली होती. याबाबत प्रस्ताव याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तातडीने प्रस्तावास मान्यता देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले होते. सोबतच प्रभाग क्रमांक 5 मधील राऊतवाडी स्टॉपपासून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे, दुतर्फा नाली बांधकाम पेव्हींग ब्लॉक मार्ग व ढापे टाकणे या 4,27,04,868 रुपयांच्या कामांचा सुद्धा प्रस्ताव 18 मार्च 2020 ला सादर केलेला होता. मात्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2019-2020 या आर्थिक वर्षासाठी चिखली नगरपरिषदेकरिता तरतुदीप्रमाणे सन 2011 च्या जनगणनेवर आधारित अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात एकूण 5,44,15,000 रुपये निधी अनुज्ञेय होता आणि चिखली न.पा.ला यापूर्वी एकूण रु. 3,36,53,400 एवढ्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती. त्यामुळे 2019- 20 साठी 2,07,61,600 इतकाच निधी शिल्लक होता. त्यामुळे रु.4.27,04,868 एवढ्या रकमेचा प्रस्तावास मान्यता देणे शक्य नसल्याने 2919- 20 चा शिल्लक 2 कोटी 7 लाख 61 हजार 600 रुपये उपलब्ध करून देऊन उर्वरित 2 कोटी 19 लाख 43 हजार 268 एवढी रक्कम 2020 – 21 मधून समायोजित करण्यात यावी, अशी मागणी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या सर्व नगरसेवकांचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्च 2021 मध्ये केली होती. त्यानुसार राऊतवाडी ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्या पर्यंतच्या रस्त्याचे कामास 5 एप्रिल 2021 रोजी मान्यता मिळून कामास सुरुवात ही झाली आहे.

चिखली नगरपालिकेत सत्ता भाजपची, प्रस्ताव तयार करणारी व सादर करणारी यंत्रणा नगरपालिका कामांच्या मान्यतेसाठी पाठपुरावा आमदार सौ. श्वेताताई महाले व भाजपाच्या नगरसेवक व नगराध्यक्षांनी केला असताना माजी आमदार मान्यता प्राप्त कामांचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रकार करीत आहे. माजी आमदार यांना काहीही न करता फुकटचे श्रेय लाटण्याची सवयची झाली आहे. या अगोदर ही त्यांनी असेच प्रकार करून सवंग लोकप्रियता मिळविण्याचा केविलवाणा प्रकार केलेला आहे. त्यांना एवढीच श्रेय घेण्याची हौस असेल तर आता सत्ता राज्यात त्यांच्याच काँग्रेस पक्षाची सत्ता असताना एकही काम ते आणू शकले नाही . उलट आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील या आमदार नसताना महिला व बाल कल्याण सभापती असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांनी चिखली विधानसभेत जवळपास 8 कोटी रुपयांची कामे खेचून आणली होती. परंतु या काँग्रेसच्या सरकार आल्याबरोबर त्यांनी त्या कामांचा आलेला निधी सुद्धा परत घेऊन कळस केलेला आहे. हा निधी चिखली मतदारसंघात आलेला होता. निधी परत आणण्यासाठी माजी आमदाराने कोणतेही प्रयत्न केले नाही. परंतु न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी माजी आमदारांनी तडफडता हे काही बरे नाही, असा टोलादेखील प्रसिद्धी पत्रकात उपनगराध्यक्षा आणि आरोग्‍य सभापतींनी लगावला आहे.