खासदार सुप्रिया सुळे उद्या जिल्ह्यात! मातृतीर्थातील ऐतिहासिक स्थळांची करणार पाहणी
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्या, पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचे उद्या, २४ सप्टेंबरला बुलडाणा जिल्ह्यात आगमन होत आहे. हा दौरा फारसा राजकीय नसून सामाजिक अंगाने जाणारा आहे.
खा. सुळे उद्या सकाळी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे दाखल होतील. यावेळी त्या जिजाऊ जन्मस्थान, राजे लखुजी जाधव राजवाडा, समाधीस्थळ आदी स्थळांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. यानंतर त्या बुलडाण्याकडे रवाना होणार आहेत. बुलडाणा येथे दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या हस्ते शरद पवार यांच्या जिल्ह्यातील जुन्या, एकनिष्ठ सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी भवन येथे सन्मान निष्ठवंतांचा हा अभिनव सोहळा आयोजित करण्यात आल्याचे बुलडाणा विधानसभा नेते नरेश शेळके यांनी सांगितले. यानंतर संध्याकाळी खा. सुळे या शेगावकडे रवाना होतील. त्या दिवंगत शिवशंकर पाटील यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करतील.