खरं बोला नाही तर जेलमध्ये टाकीन…पालकमंत्र्यांची धमकी?; अतिक्रमण हटविण्याच्‍या मागणीसाठी आलेल्या शिष्टमंडळाने केला आरोप!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाविकास आघाडी सरकारमधील एकेक मंत्री संकटात सापडत असतानाच, त्यात आता बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भर पडली असून, एका वक्तव्यामुळे ते वादात सापडले आहेत. स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी घेऊन आलेल्या मातंग समाज बांधवांच्या शिष्टमंडळाला त्यांनी ’खरं बोला नाही तर जेलमध्ये टाकीन,’ अशी धमकी दिल्याचा आरोप समाजबांधवांनी केला असून, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महाविकास आघाडी सरकारमधील एकेक मंत्री संकटात सापडत असतानाच, त्‍यात आता बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भर पडली असून, एका वक्‍तव्‍यामुळे ते वादात सापडले आहेत. स्‍मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी घेऊन आलेल्या मातंग समाज बांधवांच्‍या शिष्टमंडळाला त्‍यांनी ’खरं बोला नाही तर जेलमध्ये टाकीन,’ अशी धमकी दिल्याचा आरोप समाजबांधवांनी केला असून, या भेटीचा व्‍हिडिओही त्‍यांनी व्‍हायरल केला आहे. त्‍यामुळे बुलडाणा जिल्ह्यासह राज्‍याच्‍या राजकारणात खळबळ उडाली आहे.

चांगेफळ (ता. सिंदखेड राजा) येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीच्‍या जागेवर वसंता दत्तात्रय भालेराव या व्यक्तीने टिनशेडचे अतिक्रमण केलेले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. 16 मार्च रोजी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे ठरवले होते. त्यासाठी चांगेफळ येथे तहसीलदार व पंचायत समितीचे अधिकारी दाखल सुद्धा झाले होते. मात्र पोलीस पोहोचलेच नाहीत. पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढू नये म्‍हणून हस्तक्षेप करत अधिकाऱ्यावर दबाव टाकला, असा आरोप अशोक भालेराव व मातंग समाज बांधवांनी केला आहे.

चांगेफळ ग्रामस्‍थांनी दिलेले निवेदन.

या घटनेनंतर 20 मार्च रोजी अशोक भालेराव व त्याचे 15 सहकारी पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी बुलडाणा येथे त्यांच्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी “तुम्हाला सरपंचांनी पाठवले आहे का? खरं खरं सांगा, तुमच्या मायच्यान सांगा, सांगा पटकन नाही तर तुम्हा सगळ्यांना जेलमध्ये टाकीन” अशी धमकी दिली व निवेदन न स्वीकारता पालकमंत्री निघून गेले. न्याय तर मिळालाच नाही उलट पालकमंत्र्यांनी अपमानास्पद वागणूक देऊन जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली, अशी तक्रार चांगेफळ येथील अशोक भालेराव यांच्यासह ग्रामस्थांनी सिंदखेडराजा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदारांकडे तक्रार करताना अशोक भालेराव, विश्वनाथ भालेराव, गंभीर किसनराव भालेराव, आसाराम भालेराव, सुदाम भालेराव, संदीप भालेराव, सुधाकर भालेराव, त्र्यंबक भालेराव, मधुकर भालेराव, गोविंद भालेराव, भीमराव भालेराव, नागोराव भालेराव, सुदाम हांगरगे, दयानंद भालेराव, रमेश भालेराव उपस्‍थित होते.