कोरोना नियमांचा भंग; भाजपच्या तालुकाध्यक्षांसह ७ जणांविरुद्ध बुलडाण्यात गुन्हे दाखल
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मंदिरे व धार्मिक स्थळे उघडी करा या मागणीसाठी भाजपच्या अाध्यात्मिक आघाडीने काल, १७ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. शारीरिक दुरीच्या नियमांचे पालन न करता, मास्क न लावता व कोरोनाविषयक कोणतीही काळजी न घेता हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणात लक्ष घालून ७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक नंदकिशोर काळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. सुनील देशमुख, सिंधूताई खेडेकर, राजू समाधान काकडे, सतिश नाथराम हिवाळे, सतिश श्रीकृष्ण झाल्टे, दत्तात्रय नत्थूजी देशपांडे व शिंदे यांच्यावर कोरोना व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.