उमेदवारांसाठी रात्र वैर्याची… विरोधकांच्या हालचालींवर बारीक लक्ष; मटण पार्टीचा बेत!; दुसरीकडे कर्तव्यकठोर प्रशासनही असे झालेय निवडणुकीसाठी सज्ज!!
बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावपातळीवरील लोकशाहीचा उत्सव ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. या मतदानाची पूर्वतयारी प्रशासनाने पूर्ण केली असून, या उत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
मतदानासाठी जिल्हाभर 1803 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात 2171 मतदान केंद्राध्यक्षाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रनिहाय 2516 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. राखीव मतदान पथकांची संख्या 300 असून, मतदान केंद्रांवर कर्मचार्यांची संख्या एकूण 6916 आहे. तसेच मतदान केंद्रावर 2029 शिपायांचीसुद्धा नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 527 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार होती. मात्र 29 ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्यामुळे 498 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण 9 लक्ष 70 हजार 671 मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यात 4 लक्ष 86 हजार 010 स्त्री मतदार असून 4 लक्ष 84 हजार 661 पुरुष मतदार आहेत. सर्वात जास्त खामगाव तालुक्यात 67 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. मतदानावेळी कुठलाही एक ओळखीचा पुरावा सोबत असावा लागणार आहे. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून मतदारांना निर्भिड वातावरणात मतदान करता यावे, यासाठी पोलीस विभाग सज्ज आहे. मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडून भरघोस मतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
गावागावात कार्यकर्त्यांचे नियोजन…
गावागावात उमेदवारांना कार्यकर्त्यांचे नियोजन करावे लागत आहे. आहे. आजची रात्र वैर्याची असल्याने अर्थातच जागरण होणार आहे. उमेदवाराला लुटण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने आजची रात्र कोणत्या उमेदवारासोबत साजरी करायची याचे प्लॅनिंगसुद्धा गावागावात झाले आहे. राज्यात बर्ड फ्लूचा इशारा दिल्याने अनेक कार्यकर्त्यांनी चिकनऐवजी मटणच पाहिजे अशी आग्रही मागणी उमेदवारांकडे लावून धरली आहे. बर्ड फ्लूमुळे खाद्यरसिक चिकनकडे पाठ फिरवत असल्यामुळे मटनाचे भाव वाढून 550 ते 600 रुपये किलो झाल्याने कार्यकर्त्यांचे समाधान करताना उमेदवारांची चांगलीच आर्थिक ओढाताण होणार आहे. कार्यकर्ते सुद्धा या संधीचा चांगलाच फायदा घेत असुन त्यांच्या मागण्या वाढल्याचे एका उमेदवाराने सांगितले. चिकन नको मटनाचाच बेत पाहिजे;यासोबतच पेयाचेही वेगवेगळ्या ब्रॅण्डची मागणी होत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी हॉटेलऐवजी एखाद्याच्या शेतात, गावाबाहेरच्या एखाद्या घरात आजचे नियोजन उमेदवार करत आहे.
कोण कुठे फिरतेय लक्ष ठेवा…
उद्या सकाळी मतदान असल्याने आजच्या रात्रीला चांगलेच महत्त्व प्राप्त होणार आहे. एखादा उमेदवार मतदान फोडणार नाही याची काळजी घ्या. आपले मतदान फुटू देऊ नका पण दुसर्यांचे फोडता येते का याचा विचार करा, अशा सूचना वजा आदेश गावपुढार्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना देऊन ठेवले आहेत.
हॉटेल व्यवसायिकांची जय्यत तयारी
ग्रामपंचायत निवडणुकीचा माहौल पाहता ढाबा चालकांनीही जोरदार तयारी करून ठेवलेली आहे. ग्रामपंचायत निवडणूक असल्याने वाहत्या गंगेत हात धुणारे बरेच जण या पार्टीत येणार असल्याने हॉटेल व्यवसायिकांना आजच्या दिवशी जास्त माणसांना कामावर बोलवावे लागल्याचे एका ढाबा चालकाने सांगितले.