उंद्री व निमगाव जि.प. गटाची पोटनिवडणूक मार्चमध्ये? मतदार यादी कार्यक्रम जाहीर

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विविध कारणांमुळे रिक्त असलेल्या उंद्री, निमगाव जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक पुढील महिन्यात लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गटासाठीचा मतदार यादी कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. परिणामी मार्च एन्डच्या धामधुमीत लढत रंगण्याची चिन्हे असल्याने इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.चिखली तालुक्यातील उंद्री जिल्हा परिषद …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विविध कारणांमुळे रिक्त असलेल्या उंद्री, निमगाव जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक पुढील महिन्यात लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गटासाठीचा मतदार यादी कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. परिणामी मार्च एन्डच्या धामधुमीत लढत रंगण्याची चिन्हे असल्याने इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
चिखली तालुक्यातील उंद्री जिल्हा परिषद मतदार गटाचे प्रतिनिधित्व आमदार श्‍वेता महाले पाटील यांनी केले आहे. 2019 मध्ये झालेली आमदारकीची निवडणूक जिंकल्याने त्यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. दुसरीकडे नांदुरा तालुक्यातील निमगाव जिल्हा परिषद गटातून मधुकर वडोदे हे निवडून आले होते. त्यांचे अकाली निधन झाल्याने ती जागा रिक्त झाली. आता या दोन्ही जागांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे. हा कार्यक्रम लक्षात घेता मार्च महिन्यात पोटनिवडणूक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
घोषित कार्यक्रमानुसार यासाठी 15 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी वापरण्यात येणार आहे. ही मतदार यादी 18 फेब्रुवारीला प्रसिद्ध करून 26 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. 5 मार्च रोजी ती अधिप्रमाणित करण्यात येणार असून, 10 मार्चला मतदान केंद्र यादी व केंद्रनिहाय मतदार याद्या निर्धारित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज 5 तारखेला यासंदर्भात आदेश जारी करून जिल्हा परिषद प्रशासन, चिखली, नांदुरा तहसीलदार व पंचायत समितीचे बीडीओ यांना निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.