ई-पीक पाहणी तलाठी यांच्याकडूनच करा; चिखलीत भाजपा किसान मोर्चाची मागणी

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनाने शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातली पिक पाहणी स्वतः करून ई- पिक पाहणी या Android मोबाईल ॲपद्वारे पिक पेरा सादर करण्याचे सांगितले आहे. परंतु बहुतांश शेतकरी हे मोबाईल ॲप वापरू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे आज, ३० ऑगस्टला आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली तालुका …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनाने शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातली पिक पाहणी स्वतः करून ई- पिक पाहणी या Android मोबाईल ॲपद्वारे पिक पेरा सादर करण्याचे सांगितले आहे. परंतु बहुतांश शेतकरी हे मोबाईल ॲप वापरू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे आज, ३० ऑगस्‍टला आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्‍या मार्गदर्शनाखाली चिखली तालुका भाजपा किसान मोर्चातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पेरलेल्या पिकाची पाहणी करून त्यासंबंधीची नोंद तलाठी स्वतः शेतकऱ्याचा शेतात जाऊन करीत होते. परंतु यावर्षी पासून Android मोबाईल ॲपचे माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतः आपला पिक पेरा नोंदवावा असे प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे. परंतु यासंबंधाने अनेक अडचणी उद्भवत आहेत.

बहुतांश शेतकऱ्यांकडे Android मोबाईल नाही. ज्यांच्‍याकडे मोबाईल आहेत ते कमी क्षमतेचे असल्यामुळे हे ॲप त्यामध्ये डाऊनलोड होत नाही. बहुतांश क्षेत्रामध्ये मोबाईल नेटवर्कची मोठ्या प्रमाणात समस्या आहे. शेतकरी अशिक्षित असल्यामुळे हे ॲप ते हाताळू शकत नाहीत. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून पिक पेरा नोंदणी करणे अत्यंत कठीण झालेले आहे. यामुळे शेतकरी पिक पेरा नोंदीवाचून अनेक शासकीय लाभांपासून वंचित राहील. शासनाने तलाठी किंवा स्वयंसेवका मार्फत शेतकऱ्याचे शेतात जाऊन ई-पिक पाहणी करावी ही विनंती. अन्यथा होणाऱ्या विपरीत परिणामाची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा नमूद पत्राद्वारे देण्यात आला आहे.

निवेदन देताना भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष राजेश अंभोरे, उद्धव महाराज जवंजाळ, चक्रधर लांडे, दिगंबर जाधव, राधाबाई कापसे, महादेव ठाकरे, बबनराव पवार, संतोष ठाकरे, शिवाजी बाहेकर, एकनाथ थिगळे, आनंथा वाघमारे, जगन्नाथ लोखंडे, संतोष झाल्टे, रवींद्र जुमडे, बळीराम खरपास यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.