आमदार सौ. श्वेताताई महाले यांची चिखलीचा कायापालट करण्यासाठी धडपड ः शेख वजीरा बी शेख अनिस
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत एका नगरसेवकाने भाजपचे नगरसेवक असतानाही आणि भाजपच्या कोअर कमिटीने त्यांच्या नावाची कोणतीही चर्चा झालेली नसताना पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस नगरसेवकांच्या सह्या घेऊन सभापती पद पदरात पाडून घेतले आणि उलट आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्यावरच विकास कामे करत नसून अडथळे निर्माण करत असल्याचा केलेला आरोप खोटा असून स्वतःचे पाप लपविण्यासाठी केलेली धडपड आहे. उलट आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील या विकास कामे करून चिखली शहराचा कायापालट करण्यासाठी सतत प्रयत्नशील असून त्यासाठी त्या अहोरात्र धडपडत असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे शेख वजीरा बी शेख अनिस यांनी म्हटले आहे.
21 जानेवारीला चिखली नगरपालिका सभापती पदासाठी निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत एका नगरसेवकाने पक्षाचा आदेश झुगारून काँग्रेस नगरसेवकांच्या सहकार्याने सभापती पद पदरात पाडून घेतले. यामुळे भारतीय जनता पक्षाने हे प्रकरण गंभीर घेतलेले आहे. प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी गत नगरपालिका निवडणुकीत भाजपचे नगरसेवक आणि अध्यक्ष निवडणून येण्यासाठी रक्ताचे पाणी केले. आमदार होण्याअगोदर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून चिखली शहरातील विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. खामगाव चौफुली ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते खंडाळा चौक या रस्त्यांची कामे मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले. शहरात ठोक निधी, वैशिष्ट्य पूर्ण निधी, अल्पसंख्याक निधीमधून बागवान शदिखाना, कबरस्थानला संरक्षण भिंत, दलित वस्ती तसेच इतर विविध योजनांमधून निधी आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. चिखली शहरात पहिल्यांदा मुस्लीम महिलांसाठी रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा अफतारी सुरू केली. आमदार झाल्यानंतर सत्ता आली नसतानाही विरोधी पक्षाच्या आमदार म्हणून घरात बसून न राहता कोरोनामुळे शासकीय निधीवर बंधने असतानाही आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य वाटप, मास्क वाटप, कोरोना प्रतिबंध जनजागृती केली. कोविड काळात रक्तदान शिबिरे घेतली. लॉकडाऊनमुळे शेतकर्यांच्या शेतातील फळपिके फेकून द्यावी लागत होती. त्यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यावेळी शेतकर्यांकडून फळपिके विकत घेतली. जवळपास 20 टन फळपिके 3 हजारांच्या वर गरोदर स्त्रियांना वाटप केली. शासनाकडून प्रत्येक निधीला कट लावलेला असताना आमदार सौ. श्वेताताई महाले या निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्यांच्या आमदार निधीमधून चिखली शहरातील विविध भागात हायमास्ट लाईटची कामे करून शहरे उजळून टाकणार आहेत. असे असतानाही आमदार सौ. श्वेताताई महाले या विकास कामांत अडथळे निर्माण करतात असा आरोप करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखविण्यासारखे आहे. उलट सुरू असलेली कामे दर्जेदार, गुणवत्ता पूर्ण व्हावी यासाठी सातत्याने त्या पाठपुरावा करत आहेत. त्यामुळेच शहरात सुरू असलेली कामे चांगली होत आहे. शहरात सुरू असलेल्या कामात कुठेही भ्रष्टाचार झाला, कामे नित्कृष्ट झाली किंवा होईल त्याची मात्र चौकशी होणार यात काही चुकीचे काहीच नाही. भ्रष्टाचार होऊ नये त्यावर आमदार सौ. श्वेताताई महाले प्रशासनाला धारेवर धरतात. भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही अशा सूचना देतात त्यामुळे कुणीतरी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्यावर करत असलेले सर्व आरोप स्वतःच्या स्वार्थासाठी असून केलेलं पाप लपविण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे सुद्धा प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.