आता कळलं सुबोध सावजींना नक्की करायचं काय आहे…; बुलडाणा लाइव्हनं थेट त्‍यांनाच विचारलं!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्या माजी मंत्री सुबोध सावजी यांची राजकारणात सक्रीयता नाही. पण ती लवकरच दिसून येईल, अशी शक्यता आहे. कारण ठरलंय ते त्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी त्यांच्याकडे एक युक्ती आहे… ती त्यांनी व्हिडिओत सांगितली. मात्र त्यातून कोणताही “बोध’ ना शेतकऱ्यांना झाला, ना राजकारण्यांना… त्यामुळे बुलडाणा लाइव्हने थेट …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्या माजी मंत्री सुबोध सावजी यांची राजकारणात सक्रीयता नाही. पण ती लवकरच दिसून येईल, अशी शक्‍यता आहे. कारण ठरलंय ते त्‍यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी त्‍यांच्याकडे एक युक्‍ती आहे… ती त्‍यांनी व्हिडिओत सांगितली. मात्र त्‍यातून कोणताही “बोध’ ना शेतकऱ्यांना झाला, ना राजकारण्यांना… त्‍यामुळे बुलडाणा लाइव्हने थेट त्‍यांच्‍याशीच संपर्क करून ही युक्‍ती काय आहे, जाणून घेतले…

सुबोध सावजी यांनी एका व्हिडिओद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले अाहे, की जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर व्हावा व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे व्याजासह परत मिळावे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक गावातून ज्याच्याकडे मोटारसायकल किंवा चारचाकी आहे अशा कमीतकमी एक किंवा तीन शेतकऱ्यांनी माझ्याकडे नावे द्यावी. आठ दिवसांत शेतकऱ्यांनी ही माहिती पाठवावी. याला प्रतिसाद मिळाला नाही तर पुढील प्रक्रिया थांबवण्यात येईल, असे सावजी म्हणाले होते. ही माहिती जमवून सावजी यांना नेमके करायचे काय आहे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. “बुलडाणा लाइव्ह’ने थेट त्यांच्याकडूनच याबद्दल जाणून घेतलं. ते म्हणाले, की अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात नुकसान झाले आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नेते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देत आहेत. मात्र निवेदन देणाऱ्यांत, आंदोलने करणाऱ्यांत शेतकऱ्यांचा समावेश नसल्याने सरकारी अधिकाऱ्यांवर याचा काहीएक परिणाम होत नाही.

नुकसानग्रस्त भागात नेते दौरे करतात, ते फक्त व्हाॅट्‌स ॲपवर फोटो टाकण्यासाठी. मागील वर्षीचे पीक विम्याचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. त्यासाठी खासदार, आमदार मंत्रालयात बैठक घेतात. बैठक कशाला घेता? थेट कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करा. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर होण्यासाठी आणि पीक विम्याचे पैसे व्याजासह परत मिळण्यासाठी प्रत्येक गावातून कमीत कमी एक किंवा तीन शेतकऱ्यांनी एका ठिकाणी एकत्र यावे. भाड्याने शेतकऱ्यांना बोलावले तर ते आंदोलन राहत नाही. त्यामुळे स्वतःचे वाहन घेऊन शेतकऱ्यांना घेऊन एकत्र येऊ… राजकारण विरहित या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांच्या आमदार, खासदारांनी व पालकमंत्र्यांनी सुद्धा यावे. शेतकऱ्यांना एकत्र येऊन जर प्रशासनाला अल्टिमेटम दिला तर मदत कशी मिळत नाही ते पाहूच… मात्र शेतकऱ्यांनी जर प्रतिसाद दिला नाही तर मी घरात बसेल, असेही सुबोध सावजी म्हणाले.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. कोरडवाहू शेतीसाठी एकरी ३० हजार तर बागायती शेतीसाठी एकरी ५० हजार रुपये मदत मिळाली पाहिजे. ही मागणी शेतकऱ्यांना सोबत घेऊन प्रशासनाकडे करणार आहे. -माजी मंत्री सुबोध सावजी