आणखी एक तारिख आली बरं… वासनिक उद्या, परवा जिल्ह्यात! आलेच तर जिल्हा काँग्रेससाठी स्वातंत्र्य दिनाची रात्र ठरणार निर्णायक?

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा काँग्रेसचे “सुप्रिमो’ तथा राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांचा बुलडाणा जिल्हा दौरा पुन्हा एकदा ठरला आहे. मात्र मागील दोन वेळच्या दौऱ्याप्रमाणेच हा दौरा रद्द होतो काय, असा मजेदार प्रश्न पुन्हा नव्याने उपस्थित झाला आहे. अर्थात हा दौरा पार पडलाच तर उद्या, १५ ऑगस्ट रोजीची रात्र जिल्हा काँग्रेससाठी …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा काँग्रेसचे “सुप्रिमो’ तथा राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांचा बुलडाणा जिल्हा दौरा पुन्हा एकदा ठरला आहे. मात्र मागील दोन वेळच्या दौऱ्याप्रमाणेच हा दौरा रद्द होतो काय, असा मजेदार प्रश्न पुन्हा नव्याने उपस्थित झाला आहे. अर्थात हा दौरा पार पडलाच तर उद्या, १५ ऑगस्ट रोजीची रात्र जिल्हा काँग्रेससाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. याचे कारण मुकुल वासनिक बुलडाणा येथे मुक्कामी राहणार असल्याने जिल्हाध्यक्ष बदलावर निर्णायक चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

रोखठोक नेते नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून बुलडाणा जिल्हाध्यक्ष बदलाचे वारे जोराने वाहू लागले. आता त्या वाऱ्यांनी वादळाचे रूप घेतले आहे. डझनभर इच्छुक, त्यांचे लॉबिंग, मुंबई ते दिल्ली वाऱ्या, नानांचा जिल्हा दौरा, काँग्रेसमधील गटबाजी, वासनिकांच्या विरोधात सुरू असलेल्या गुप्त हालचाली, यामुळे जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे. बदल होणार असा आजचा रागरंग असला तरी त्यात मुकुल वासनिकांचा एकमेव व्हेटो पॉवर चालणार, हे उघड रहस्य आहे. यामुळे वासनिकांचा दौरा वरकरणी सांत्वनपर असला तरी तो राजकारणविरहित राहूच शकत नाही! म्हणूनच या दौऱ्याचे आगळेच महत्व आहे.

मात्र आजवर दोनदा दौरे रद्द झाल्याने नेते अन्‌ निष्ठावान कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. मागील २१ जून रोजीचा एकदिवसीय, १० व २० जुलै रोजीचा दौरा दोनदिवसीय दौरा ऐन वेळी रद्द झाला. आता १५ व १६ ऑगस्ट रोजी वासनिकांचा दौरा लागल्याने तो कसा होईल याच्या उत्सुकतेपेक्षा तो कॅन्सल तर होणार नाही याची धास्ती जास्त आहे. मात्र आता रद्दची हॅट्‌ट्रिक होणार नाही किंबहुना दौरा होणारच, असा दावा पक्ष सूत्रांनी बोलून दाखविला आहे. असे ठरले तर स्वातंत्र्य दिनाची रात्र जिल्हा काँग्रेससाठी अर्थात इच्छुकांसाठी निर्णायक ठरणार हे उघड आहे. याचे कारण दिल्ली, मुंबईपर्यंत पोहोचू न शकणारे नेते, कार्यकर्ते यांच्याशी या जनाधारप्राप्त व कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या या नेत्याला मनमोकळे पणाने बोलता येईल. तसेच जिल्हा काँग्रेसमधील वारे कोणत्या दिशेने वाहत आहे हे वासनिकानाही कळेल हे उघड आहे.

दृष्टीक्षेपात दौरा…
१५ ऑगस्ट ः
दुपारी ३ वाजता सिंदखेड राजा, चार वाजता साखरखेर्डा, साडेपाचला चिखली, संध्याकाळी ७ वाजता सावरगाव डुकरे, रात्री ८ वाजता मूर्ती (ता. मोताळा), मुक्काम : बुलडाणा.
१६ ऑगस्ट ः सकाळी साडेआठला नांदुरा, दहा वाजता जळगाव, साडेअकराला सोनाळा, दुपारी १ वाजता शेगाव आणि दुपारी २ वाजता कारद्वारे नागपूरकडे रवाना.