आ. श्वेताताई महाले यांची मागणी ः ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिवृष्टीमुळे पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा. ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केली आहे. याबाबत त्या मुख्यमंत्री, महसूल मंत्री व मदत पुनर्वसन मंत्र्यांना भेटणार आहेत. अतिवृष्टीमुळे पैनगंगेचे उगमस्थान असलेल्या आणि येळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या पाडळी महसूल मंडळात …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिवृष्टीमुळे पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा. ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केली आहे. याबाबत त्‍या मुख्यमंत्री, महसूल मंत्री व मदत पुनर्वसन मंत्र्यांना भेटणार आहेत.

अतिवृष्टीमुळे पैनगंगेचे उगमस्थान असलेल्या आणि येळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या पाडळी महसूल मंडळात १२६ मिलिमीटर पाऊस पडल्याने येळगाव धरण ओव्हरफ्लो होऊन धरणाचे ८० स्वयंचलित दरवाजे एकत्र उघडल्याने पैनगंगा नदीला पूर येऊन येळगाव, सव, खूपगाव, किन्होळा, वाडी, ब्रह्मपुरी, सवणा, सोमठाणा, दिवठाणा, पेठ, उत्रादा, बोरगाव काकडे व कोलारी, सवणा, उत्रादा, दिवठाणा, पांढरदेव, देवधरी व इतर नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा पडला. पैनगंगेच्या येळगाव धरणाखाली पावसाची सरासरी कमी असली तरी पाडळी मंडळात पडलेल्या अतिप्रचंड पावसाने पैनगंगेच्या पात्रातील चिखली तालुक्यातील सर्वच गावे जलमय होऊन अतिप्रचंड नुकसान झाले आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघातील बुलडाणा तालुक्यातील साखळी महसुली मंडळात ८० मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे साखळी, शिरपूर, पिंपळगाव सराई, पांगरी, केसापूर, अंत्री तेली, कोलारी ही गावे बाधित झाली. चिखली तालुक्यातील चांधई महसुली मंडळात ६५.३ मिलिमीटर पाऊस झाला. सोयाबीनच्या ऐन काढणीवेळी हा संततधार पाऊस पडत असल्याने सोयाबीन पीक पाण्यात गेल्याने पिकांचे १०० टक्‍के नुकसान झाले आहे. उडीद, मूग तर हातातून गेलाच; पण आता उभ्या सोयाबीनला सुद्धा दोन दिवसांनंतर कोंब फुटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे होत नाही तोच सप्टेंबरमध्ये पडत असलेल्या पावसाने चिखली व बुलडाणा तालुक्यातील नदीनाल्या काठच्या गावांमधील शेतीपिकांचे व जमिनी खरडून जात गेल्याने शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून सोयाबीन, उडीद, मूग, मका ही पिके गेल्याने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत देऊन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी केली आहे.