काँग्रेसमध्ये तुमचा मान-सन्मानच! नगराध्यक्षा बोंद्रेंना मंत्री ठाकुरांचा शब्द!

चिखलीत पडला काँग्रेस प्रवेश सोहळा
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : काँग्रेसमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला किंमत आहे. भाजपामध्ये कार्यकर्त्याला किंमत नाही. भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या प्रत्येकाचा मान-सन्मान केला जाईल. गुणवत्तेनुसार पक्षात स्थान दिले जाईल. काँग्रेसचा हात आम आदमीसोबत आहे. चिखली नगरपरिषदेसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हा काँग्रेसच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. चिखलीच्या नगराध्यक्षा सौ. प्रिया बोंद्रे, त्यांचे पती कुणाल बोंद्रे व भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश सोहळा आज, 28 ऑक्टोबरला दुपारी पार पडला. त्यावेळी मंत्री ठाकूर बोलत होत्या. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मनिषा सपकाळ, सौ. जयश्री शेळके, नगरसेवक गोपाल देव्हडे, जिल्हा परिषद सदस्या शैलाताई पठाडे, श्याम पठाडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. चिखलीतून काँग्रेसयुक्त भारताची सुरुवात झाली आहे, असे सांगून यशोमती ठाकूर म्हणाल्या, की जलयुक्त शिवार योजनेत क्लिनचिट मिळाल्याची बातमी खोटी आहे. मोदी सरकार राज्य सरकारबद्दल सूडबुद्धीने वागत आहे. कोरोनाच्या लसी राज्याला कमी प्रमाणात दिल्या. राज्यात कोरोना वाढावा ही केंद्र सरकारचीच इच्छा होती, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटारडे आहेत, असे त्या म्हणाल्या.

तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही -राहुल बोंद्रे
या ऐतिहासिक प्रवेश सोहळ्याची चिखलीच्या इतिहासात नोंद होईल.चिखलीच्या जनतेने बोंद्रे घराण्यावर नेहमीच विश्वास दाखवला. बोंद्रे घराण्यानेही चिखलीसाठी सर्वस्व अर्पण केले. बोंद्रे घराण्याने कधीही विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. प्रियाताई बोंद्रे चिखलीच्या नगराध्यक्षा असताना त्यांनी भरभरून विकास केला. मात्र भाजपने विकासामुळे त्यांना निष्काषित केले. त्यांना भाजपात बोलू देत नव्हते. मात्र आता त्या त्यांच्या घरात आल्या आहेत. भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या कार्यकर्ते, नेत्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असा शब्द जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी दिला. प्रिया बोंद्रे विकास करत असताना आम्ही विकासकामात अडथळा आणला नाही. पक्ष सोडताना आज तुमच्या डोळ्यात पाणी आहे. मात्र येणार्‍या नगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर ज्यांनी तुम्हाला पक्षातून काढले त्यांच्या डोळ्यात पाणी राहील. नवीन लोक पक्षात आले तरीसुद्धा जुन्यांना देखील नाय दिला जाईल, असे राहुल बोंद्रे म्हणाले.
यावेळी कुणाल बोंद्रे म्हणाले, की काँग्रेसने कधीही चिखलीच्या विकासकामात अडथळा आणला नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आम्हाला विरोध नव्हता तर केवळ स्थानिक नेत्यांचा विरोध होता, असे कुणाल बोंद्रे म्हणाले.

चुकीने म्हणाले, भाजप नेत्यांचे आभार...
पक्षात प्रवेश दिल्याबद्दल मी भाजपच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो, असे कुणाल बोंद्रे चुकीने म्हणाले. मात्र चूक लक्षात येताच लगेच त्यांनी काँग्रेस नेत्यांचे आभार मानत असल्याचे म्हणाले. यावेळी भाजपात प्रवेश करणार्‍या जिल्हा परिषद सदस्य पती श्याम पठाडे व नगरसेवक गोपाल देव्हडे यांचेही भाषण झाले. अजिम नवाज राही यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार काँग्रेस तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर यांनी मानले.

महाविकास आघाडी सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी : मंत्री यशोमती ठाकूर
अतिवृष्टीने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागातील शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. काही जिल्ह्यातील आकडेवारी उशिरा पोहोचली म्हणून मदतीचे आदेश पुढे मागे निघत आहेत. मात्र मदतीपासून कुणीही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री  यशोमती ठाकूर चिखली येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. राज्यात यंदा शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकार कोणत्याही जिल्ह्यासोबत भेदभाव करणार नाही. भेदभाव करीत असल्याचा आरोप चुकीचा आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कायम शेतकर्‍यांच्या पाठिशी आहे. शेतकर्‍यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.