मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या महिला बचत गट कार्यशाळा! दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनचे आयोजन
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने २६ सप्टेंबर रोजी महिला बचत गट कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. राजर्षी टॉवरच्या शेजारील सभागृहात दुपारी १२ वाजता ही कार्यशाळा होणार आहे.
खा. मुकुल वासनिक हे काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील दिगग्ज नेते आहेत. बुलडाणा जिल्ह्याशी त्यांचे ऋणानुबंध आहेत. जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता जपणे, त्यांना मोठे करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांचा वाढदिवस जिल्ह्यात दरवर्षी धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. यानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
दिशा बचतगट फेडरेशनच्यावतीने खा. मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचतगट कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके मार्गदर्शन करणार आहेत. महिलांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्हाभर बचतगटांचे जाळे विणले असून १४०० बचतगट संलग्न आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करुन त्यांचा सामाजिक स्तर उंचावणे हा दिशा फेडरेशनचा उद्देश आहे. ग्रामपातळीवर नवीन बचत गट स्थापन करणे, बंद पडलेल्या बचत गटांचे पुनरुज्जीवन करणे, बचत गट चालविण्याचे प्रशिक्षण, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, लघुद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन, उद्योगासाठी तांत्रिक मार्गदर्शन, उद्योगाकरिता भांडवल उभारणे, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करण्याचे कार्य दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून चालते. बाजारपेठेतील वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी बचतगटांना आर्थिक बळ देऊन प्रोत्साहित करण्यावर भर देण्यात येतो. बचतगटांच्या उत्पादनास जिल्ह्यातच नव्हे तर राज्यासह देशभर बाजारपेठ उपलब्ध करण्याचा दिशा बचतगट फेडरेशनचा प्रयत्न आहे.