बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल मंत्रालयात जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कृषी मंत्र्यांनी बैठक घेतली.पीक विमा ३१ ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे सरकारने सांगितले. रविकांत तुपकर यांनी सरकारच्या या घोषणेवर जोरदार प्रहार केला असून "यांच्या तारखांवर विश्वास ठेवू नका, याआधी त्यांनी अनेकदा तारखा दिल्या, त्याच्या बातम्या पेपर मध्ये छापून आणल्या" असे म्हणत तुपकर यांनी जुन्या बातम्यांची कात्रणे दाखवली. लबाडा घरचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही, आता शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले. जे लोकप्रतिनिधी बैठकीत होते,तेच सत्तेत आहेत..मग आतापर्यंत पिक विमा का जमा झाला नाही? खडा सवाल करीत विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर असल्याने सत्ताधारी आमदारांना पिक विम्याचा पुळका आल्याचा घणाघात रविकांत तुपकर यांनी केला. आज,८ ऑगस्ट रोजी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पुढे बोलतांना रविकांत तुपकर म्हणाले की,"कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा बाईट ऐकल्यावर हसुही आले आणि कीव वाटली. ३१ ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार असल्याचे ते म्हणाले, मात्र अशा तारखा गेल्या सहा महिन्यांपासून ते देत आहेत. आता जमा होईल, पंधरा दिवसाला जमा होईल,असे तारीख पे तारीख सुरू आहे, मात्र काहीच होत नाही" असे तुपकर म्हणाले. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने एकी दाखवली, पीक विम्याचा प्रश्नांवर शेतकरी रस्त्यावर उतरले, तुरुंगात गेले,लाठ्या काठ्या खाल्ल्या त्यामुळे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे आमदार कधी पिक विमा प्रश्नावर बोलले नाहीत त्या जिल्ह्यातील आमदारांना आता पीक विम्याचा पुळका आला आहे, जसं काही ते आता त्यांच्या घरातून पीक विमा देणार आहेत असा टोला तुपकर यांनी लगावला.
आता पुन्हा पिकविम्याचा प्रश्न पेटला आहे, मेहकर आणि मलकापूरात आम्ही मोर्चा काढला. चिखलीत विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरू शकतो म्हणून आता अशा बैठकावर बैठका सुरू असल्याचे तुपकर म्हणाले.२१ जून रोजी संजय कुटेंनी सांगितलं की या जून महिन्यातच पीक विमा जमा करू, प्रतापराव जाधवांनी सांगितलं की २४ जुलैला पीक विमा जमा करणार, त्यानंतर पुन्हा संजय कुटेंनी सांगितल की १५ ऑगस्टला पीक विमा जमा होणार, त्यानंतर आता पुन्हा ३१ ऑगस्टची तारीख दिली. या तारखेलाही पीक विमा मिळेल की नाही याची शंका आहे कारण लबाडा घरचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही असे रविकांत तुपकर म्हणाले. यावेळी रविकांत तुपकर यांनी पेपरची कात्रणेच माध्यम प्रतिनिधींना
दाखवली. तुमची सत्ता आहे, तुम्हाला बैठका घेण्याची गरजच नाही, मात्र विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकरी आपल्या विरोधात जातील या भीतीपोटी केवळ तारीख पे तारीख देण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचेही तुपकर म्हणाले. " पीक विम्याचा विषय केंद्र सरकारचा आहे. जर तुम्ही केंद्रात मंत्री आहात तर तुम्ही ही पीक विमा कंपनी ब्लॅक लिस्ट मध्ये का टाकली नाही?" असा सवाल तुपकर यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना केला. सरकारच्या तारखांच्या भरवश्यावर राहू नका, आता पीक विम्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा असे आवाहनही तुपकर यांनी शेतकऱ्यांना केले.