आज बुलडाणा जिल्ह्यात इतिहास घडणार? रविकांत तुपकरांच्या 'पाना' ची जोरदार हवा! 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. याच नियमानुसार बुलडाणा लोकसभा मतदारसंघात सध्या परिवर्तानाचे वारे जोमाने वाहू लागले आहेत. अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना जिल्ह्यातील कोनाकोपऱ्यातून आणि सर्वच घटकांमधून जोरदार प्रतिसाद आणि समर्थन मिळत आहे. शिवाय सर्वच सर्वे आणि एक्झीट पोलच्या अंदाजानुसार रविकांत तुपकरांचा पाना' आघाडीवर आहे. त्यामुळे यावेळी बुलडाणा जिल्ह्यात इतिहास घडणार असल्याची तुफान चर्चा आहे . मातब्बर उमेदवारांना पराभूत करत अपक्ष उमेदवार विजयी करण्याची क्रांती या मतदारसंघातील मतदार घडवून आणत असल्याची चिन्हे आहेत. या निर्णायक लढतीत तुपकरांचा विजय झाल्यास हा संपूर्ण महाराष्ट्रात एक नवा संदेश देणारा निकाल ठरणार आहे.

बुलडाणा मतदारसंघात प्रथमदर्शनी तिरंगी लढत होईल असे आधी बोलले जात होते. परंतु आता दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते आपली फाईट अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्याशीच आहे, असे म्हणत आहेत. त्यामुळे तुपकर स्वतंत्र असुनही सध्या जिल्हाभर सर्वच स्तरातून आघाडीवर आहेत. सक्षम पर्याय म्हणून पक्षीय व्होटबॅक फोडण्यात तुपकर सरस ठरत आहेत. त्यामुळेच पक्षीय पदाधिकारी राजीनामा देऊन उघडपणे तुपकरांच्या प्रचाराला भिडले होते. तर दुसरीकडे नवा चेहरा व कोरी पाटी म्हणून तुपकरांना पहिली पसंती मिळत असल्याचे मतदारसंघात आज मतदानाच्या दिवसापर्यंत कायम आहे.

खेड्यापाड्यातील जनता स्वत: खर्च करून तुपकरांसाठी दिवसरात्र झटल्याचे अवघ्या जिल्ह्याने पाहिले. तरुण, वयोवृध्द, बायाबापड्या, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर  ह्या सर्वांसाठी तुपकर हे एक आशास्थान निर्माण झाले आहे.  त्यांनी तूपकरांवर शंभर टक्के विश्वास टाकला आहे. ग्रामीण भागातील जनतेचे त्यांच्यावर इतके जीवापाड प्रेम पाहून शहरातील प्रत्येक माणूस भारावून गेला आहे. मध्यमवर्गीय नोकरदार वर्ग, कामकरी वर्ग, व्यापारी वर्ग, छोटे मोठे व्यावसायीक ह्या सर्वांचे मत आता तुपकरांसाठी अनुकूल बनले आहे. तुपकरांच्या चांगल्या स्वभावामुळे त्यांना जात, पात, धर्म कशाचीही आडकाठी नाही.  थोडक्यात तुपकर आता खेडे आणि शहर ह्या दोन्ही भागात लोकप्रिय झाले आहेत. बुलडाणा, सिंदखेड राजा, मेहकर, देऊळगाव राजा चिखली, खामगाव, जळगाव जामोद अशी मोठी शहरे असो की संग्रामपूर, मोताळा, साखरखेर्डा यासह लहान शहरे व गावे असो सगळीकडे तुपकरांचा जोरदार बोलबाला आहे . ही सर्व परिस्थिती रविकांत तुपकर यांना विजयाच्या वाटेवर नेणारी आहे. अर्थात या लढतीचा निकाल लागण्यासाठी ४ जूनपर्यंतची वाट संबंध महाराष्ट्राला पहावी लागणार आहे.