महायुतीचा घटक असुनही शिंदेंची शिवसेना आ. डॉ.राजेंद्र शिंगणेंच्या एवढी मागे का लागली? युवासेना उपजिल्हाप्रमुखांनी डॉ.राजेंद्र शिंगणेंवर केलेत गंभीर आरोप; वाचा नेमके मॅटर आहे तरी काय...

 

चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी महायुतीचा भाग आहे. दोन लोकसभा निवडणुका खा. प्रतापराव जाधव यांच्या विरोधात लढलेले डॉ.राजेंद्र शिंगणे यंदा प्रतापराव जाधवांच्या विजयासाठी जीवाचे रान करतांना दिसले. प्रतापराव जाधव केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांच्या सिंदखेडराजा येथील नागरी सत्काराच्या आयोजनासाठी डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पुढाकार घेतल्याचे दिसले. मात्र एवढे असूनही शिंदेगटाची शिवसेना डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर काही खुश दिसत नाही..नव्हे नव्हे तर लवकरात लवकर डॉ.राजेंद्र शिंगणेंनी शरद पवार गटाची वाट धरून महाविकास आघाडीत जावे अशी सिंदखेडराजा मतदारसंघातील शिंदेच्या शिवसेनेतील काहींची इच्छा आहे.अर्थात त्याला कारणही तसेच आहे.

डॉ.राजेंद्र शिंगणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले तरच शिंदेगटाच्या शिवसेना नेत्यांना विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावता येईल, अन्यथा चांगलीच घोर- निराशा होऊ शकते. त्यामुळेच की काय वरवर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसत असली तरी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात मात्र चांगलीच अंतर्गत धुसफूस सुरू आहे. शिंदे गटातील शिवसेनेचे काही पदाधिकारी उघड उघड डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर आरोप करून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहे..अर्थात याला कुण्या तरी महत्त्वाकांक्षी नेत्याची फुस असेल अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आता रेतीमाफियांविरोधात सातत्याने आंदोलन करून चर्चेत येणारे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांची तक्रारच भुतेकर यांनी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्याकडे केली आहे. अर्थात आ. डॉ.राजेंद्र शिंगणे महायुतीचा घटक असल्याने घरचा प्रश्न घरात सोडवता आला असता असाही एक सुर आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड येथील एक प्रकरण आहे, त्यावरून भुतेकर यांनी डॉ.शिंगणे यांच्यावर आरोप केले आहेत.
भुतेकर यांनी तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार आ. डॉ राजेंद्र शिंगणे २००८ -९ मध्ये महसूल राज्यमंत्री असताना टाकरखेड येथे संत चोखामेळा सोया प्रकल्प उभारण्यासाठी त्यांनी गावातील ई - क्लास जमीन स्वतःच्या संस्थेच्या नावावर करून घेतली. परिसरातील शेतकऱ्यांचे शेअर सुद्धा घेण्यात आले .सोया प्रकल्प उभा राहिला तर बेरोजगारी दूर होईल, गावाला चांगले दिवस येतील अशी आशा गावकऱ्यांना दाखवण्यात आली मात्र प्रकाराला १६ -१७ वर्षे होऊनही विषय पुढे गेला नाही. "त्या" जमिनीला तार कंपाऊंड करण्यात आले. ई क्लास जमीन घेतल्यानंतर अटी शर्तींची उल्लंघन झालेले आहे असा दावा देखील भुतेकर यांनी केला आहे.
 डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी टाकरखेड येथील गावकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचे भुतेकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावर योग्य तो निर्णय घ्यावा नाहीतर संबधित जमीन गावकऱ्यांना परत करावी व शेअर सुद्धा शेतकऱ्यांना परत करावे अशी मागणी भुतेकर यांनी केली आहे. गावकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या संस्थेच्या संचालकांवर पंधरा दिवसांच्या आत कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही भुतेकर यांनी दिला आहे.