ते ६२ गद्दार अन्‌ त्‍यांचे गॉडफादर कोण?; महाविकास आघाडीला धक्का
 

आगामी निवडणुकांतील संभाव्य आघाडी वांध्यात!!
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विधान परिषदेच्या अकोला- बुलडाणा- वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात झालेला दारुण व लज्जास्पद पराभव हा केवळ गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव नसून, तो महाआघाडीचा देखील पराजय असल्याचे मानले जात आहे. यामुळे आघाडीत मोठी बिघाडी असल्याचे सिद्ध झाले असून, नजीकच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य  संस्थांच्या निवडणुकांत आघाडी होण्याची शक्यता धोक्यात आली आहे. दुसरीकडे  किमान 62 मते फुटल्याने गद्दार नेते व सदस्यांचा शोध घेण्याचे आव्हानही आघाडीसमोर उपस्थित झाले आहे.

बाजोरिया यांच्याविरुद्ध असलेली नकारात्मक लाट, त्यांचा अति आत्मविश्वास, आघाडीमधील बिघाडी अन्‌ नेत्यांमधील समन्वयाचा अभाव ही या पराभवाची काही कारणे ठरली.  मात्र 62 सदस्य व त्यांचे गॉडफादर नेते यांच्या फितुरीला अनेक कंगोरे आहेत. बाजोरियांनी "भरपूर मोजले' असतानाही त्यांनी "दाम घेऊनही काम' न करण्यामागची विविध कारणे आहेत. फितूर नेत्यांनी आघाडीचे व बाजोरिया यांचे हित लक्षात न घेता "डबल गेम' करत आपापले पुढील राजकारण सांभाळले.

विधानसभा निवडणुकीत आघाडी नाहीच या खात्रीने त्यांनी आपला प्रतिस्पर्धी, अनुकूल निकालाने आणखी मोठा होईल, त्याचे राजकीय वजन वाढेल  या भीतीपोटी टोकाचे राजकारण केले. वसंत खंडेलवाल यांच्या प्रचाराच्या अनधिकृत मुख्यालय वा भाजपच्या भाषेत सांगायचे झाल्यास "वॉर रूम'ला भेटी देणारे व "हात ओले' करणाऱ्यांमध्ये सर्व पक्षीय महाभागांचा समावेश असल्याची चर्चा आता रंगत आहे. या महागद्दारीत व बाजोरियांच्या एकतर्फी पराभवात अगदी त्यांच्या स्वकीयांचा देखील हात असल्याचे वृत्त आहे.

काँग्रेस 190, शिवसेना 130 व राष्ट्रवादी काँग्रेस 76 असे मिळून आघाडीचे 396 मतांचे बलाबल होते. मात्र प्रत्यक्षात 334 मतेच मिळाली. तब्बल 62 मते फुटल्याने फितुरी नियोजन बद्ध होती. नियोजनासाठी प्रसिद्ध पक्षाने विरोधकांच्या मदतीने व "मिले सूर मेरा तुम्हारा' या धर्तीवर ती भाजपाकडे खेचली असा रागरंग आहे.

मातोश्रीपर्यंत उमटणार पडसाद...
याचे पडसाद आगामी काळात उमटत जाणार असून, राज्यस्तरीय आघाडी समन्वय समितीच काय अगदी "मातोश्री'पर्यंत त्याचा गंभीर रिपोर्ट जाणार हे नक्की. पण आघाडी गद्दारांचा शोध घेण्याची व त्यांना दंड करण्याची शक्यता कमीच आहे. याचे कारण आगामी स्थानिक निवडणुका नजीकच आहेत. त्यात याच महाभागांना उमेदवारी (विथ पार्टी फंड) देऊन इलक्शन लढवायचं हाय! हा जर तरचा विषय असला तरी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या अन्‌ नगर परिषद निवडणुकांत आघाडी होण्यावरच आता भले मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. आघाडीतील "मोठा भाऊ' असलेल्या काँग्रेसने अगोदरच स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे अगोदरच आघाडीत संभ्रम असताना विधान परिषदेच्या निकालाने आघाडीचे बळ व ताकद यातील पोकळपणा दिसून आला. केवळ 244 हक्काची मते असताना वसंत खंडेलवाल यांनी तब्बल 190 जादा मते खेचण्याचा पराक्रम करून दाखविला! हा मोठा विजय सर्वपक्षीय आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. यामुळे केवळ बाजोरियाच  हरले असे नव्हे तर आघाडी, त्यांचे भविष्यातील मनसुबे, योजना, नियोजन हे सारे काही पराभूत झाले. याउलट भाजपा लढतीतच नव्हे आघाडीत दीर्घकालीन बिघाडी, नेत्यात बेबनाव, संशय निर्माण करण्यात आणि कार्यकर्त्यांची हिंमत कमी करण्यातही विजयी झाली...