कोण आला रे कोण आला..शिवसेनेचा वाघ आला! मोताळा तालुक्यात मशालजागर यात्रेचा झंझावात; शंभरावर गावात पोचली यात्रा ! जालिंधर बुधवंत म्हणाले,शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठीच आक्रोश मोर्चा...!

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांना बळीराजा म्हणताना त्यांच्या अडचणी राज्य सरकारला दिसत नाहीत. शिंदे, फडणवीस ,अजितदादा सरकार केवळ घोषणाबाजी करून इव्हेंट मॅनेज करत आहे. मोताळा तालुक्यातील शंभरावर गावात मशाल जागर यात्रा पोहोचली. शेतकऱ्यांच्या व्यथांना फोडण्यासाठीच २३ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे त्यात मायबाप शेतकऱ्यांनी सामील व्हावं अस आवाहन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी धामणगाव बढे येथे केले.

  मोताळा तालुक्यात गाव टू गाव मशाल यात्रेद्वारे जागर करण्यात आला. ५ सप्टेंबर पासून ही यात्रा सुरू झाली आहे. शेतकरी बांधवांनी छोटेखानी कॉर्नर सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मशाल जागर यात्रेचा रथ आणि त्याद्वारे गावात निघणाऱ्या रॅल्यांना स्वतःहून सहभाग नोंदवत आपला रोष व्यक्त केला आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या व्यथा दिसत नाहीत. कायद्याचे राज्य उरलेलं नाही. जनसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे. सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शेतकरी , बेरोजगार व सामान्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन या मशाल जागर यात्रेतुन जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले. 
या आहेत आक्रोश मोर्चाच्या मागण्या...
शेतकरी कर्जमुक्ती झाली पाहिजे, अटी कमी करून शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा रक्कम द्यावी, शेतातील वीज पंपाचे वीज बिल माफ करावे, शेतीला पूर्ण क्षमतीने २४ तास वीज पुरवठा करावा, नादुरुस्त असलेले रोहित्र (डीपी) तात्काळ कार्यान्वित करावे, ठिबक व तुषार सिंचनाचे रखडलेले अनुदान शेतकऱ्यांना द्यावे, वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान थांबवण्यासाठी सोलार सुरक्षा कुंपण उभारून द्यावे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सर्पदंशाचा समावेश करून लाभ द्यावा, शेतकऱ्यांच्या थकीत नुकसान भरपाईचे भिजत घोंगडे तात्काळ मार्गी लावावे, बेरोजगारांना रोजगार व नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी, महिला व मुलींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न समोर आला आहे. राज्य सरकार याबाबत सफशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सक्षम करावी, शेतमालाला उत्पादन खर्च आधारित भाव द्यावा यामध्ये सोयाबीनला किमान ८ हजार रुपये व कापसाला किमान १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याच्या आग्रही मागणीसाठी जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात २३ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. 
१३ सप्टेंबर पासून बुलढाणा तालुक्यात...
मशाल जागर यात्रेचा पहिला टप्पा हा मोताळा तालुक्यात पूर्णपणे पार पडला आहे. सुमारे शंभरावर गावांमध्ये आतापर्यंत यात्रा पोहोचली आहे. आता १३ सप्टेंबर पासून ही यात्रा बुलडाणा तालुक्यात येणार आहे.