बाजोरियांपुढे भाजप कोणता तगडा उमेदवार देणार?
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची घोषणा अखेर आज, ९ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने केली. राज्यातील ७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आमदारांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२२ ला संपत आहे. त्यासाठी राज्यातील ५ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या ६ जागांसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी ही निवडणूक घेणे अपेक्षित होते. त्यानुसार निवडणुका घोषित झाल्याने या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद सदस्यांचे भाव वाढले आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम...
१६ नोव्हेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. २३ नोव्हेबरपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करतील. २४ नोव्हेंबरला अर्जाची छाननी होईल. २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. १० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.
गोपीकिशन बाजोरियांना कोण देणार टक्कर
गेल्या तीन निवडणुकांपासून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया अकोला- बुलडाणा- वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका व नगरपालिकेचे नगरसेवक व पंचायत समितीचे सभापती या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावत असतात. यापूर्वीच्या तिनही निवडणुका गोपीकिशन बाजोरिया यांनी भाजपसोबत युती असताना लढवल्या होत्या. भाजप- सेनेचे मतदार कमी असतानाही बाजोरिया या निवडणुकीत बाजी मारतातच कसे, असा प्रश्न अनेक राजकीय पंडितांना पडलेला आहे.
अर्थात या निवडणुकीत पक्षापेक्षा कशाला जास्त महत्त्व दिले जाते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे जि. प. सदस्य आणि नगरसेवकही या निवडणुकीची वाट पाहत असतात. येणाऱ्या निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती नसल्याने भाजप वेगळी लढणार हे स्पष्टच आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीची "या' निवडणुकीची व्यूहरचना काय हे अजूनही समोर आलेले नाही. गोपीकिशन बाजोरियांसमोर त्यांच्या सारखाच "सर्वच' दृष्टीने तगडा उमेदवार भाजपला द्यावा लागणार आहे. मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती किंवा भाजपचे बुलडाणा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांचे नाव भाजपकडून समोर येण्याची शक्यता आहे. अर्थात या सर्व श्यक्यता असून वेळेवर पक्ष कोणता निर्णय घेतो हे अर्ज भरतेवेळीच समोर येईल एवढे मात्र नक्की.