आमदार डॉ.राजेंद्र शिंगणेंच्या डोक्यात काय? कुणालाच काही कळेना! महायुतीच्या अन् महाविकास आघाडीच्या इच्छुकांनाही केले कन्फ्युज;
माजी आमदार खेडेकरांची अवस्था तर अती-बिकट.....
Updated: Oct 11, 2024, 13:20 IST
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. त्यामुळे राज्यातील प्रमुख सहाही पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. इच्छुक उमेदवार आपापल्या परीने आपणच कसे इलेक्टिव मेरीटचे उमेदवार आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील ७ पैकी ६ विधानसभा मतदारसंघाचे राजकीय चित्र बऱ्यापैकी स्पष्ट दिसत आहे. मात्र सिंदखेडराजा एवढी अस्पष्टता कोणत्याही मतदारसंघात नाही..अर्थात या अस्पष्टतेला कारणीभूत ठरत आहे ती आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांची खेळी.. जमाना टी -ट्वेंटी चा असला तरी आ.शिंगणे मात्र कसोटी क्रिकेटसारखी संयमी खेळी करत असल्याने सिंदखेडराजातून आमदारकीसाठी इच्छुक असलेले सारेच कन्फ्युज आहेत..त्यातल्या त्यात अनेक पराभवानंतर एकदा आमदारकी उपभोगणारे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांची अवस्था तर पार बिकट अशी झाले आहे, करावे तरी काय? असा राजकीय प्रश्न त्यांच्यासमोर "आ" वासून उभा आहे.
आ.डॉ.राजेंद्र शिंगणे सध्या कागदोपत्री महायुतीत आहे. जिल्हा बँकेच्या हिताचे कारण सांगून ते अजितपवारांच्या राष्ट्रवादीत आले. आता "आवश्यक बाबी " साध्य झाल्यानंतर डॉ.शिंगणे सध्या तटस्थ भूमिकेत आहेत की काय ? अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण महायुतीसोबत त्यांचा "अतीघरोबा" दिसत नाही.त्यांच्या बॅनर वर, वर्तमानपत्रातील जाहिरातीत महायुतीचे नेते कुठे दिसत नाहीत. शिवाय डॉ.शिंगणे कोणत्याही क्षणी घरवापसी करून तुतारी हाती घेतील असे चित्र गेल्या दोनेक महिन्यांपासून आहे, मात्र अद्याप आमदार डॉ.शिंगणे यांनी कुणालाच काही कळू दिले नाही.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीतून आ.डॉ.शिंगणे यांनी स्वतः माघार घेतली होती. तो अपवाद वगळता विधानसभा निवडणूक लढणे म्हणजे जिंकणे हे समीकरण आ.डॉ.शिंगणे यांना चांगलेच अवगत आहेत. ते महायुतीतच राहिले तर त्यांची उमेदवारी जवळजवळ फिक्स आहे, दुसरीकडे त्यांची जर पुन्हा घरवापसी होऊन त्यांनी तुतारी हाती घेतलीच तर महाविकास आघाडी कडून तेच प्रबळ उमेदवार म्हणून समोर येतील. मात्र नेमका निर्णय घ्यायला डॉ.शिंगणे यांच्याकडून उशीर होत असल्याने दोन्ही बाजूचे इच्छुक उमेदवार प्रचंड कन्फ्युज आहेत..
तरच मार्ग मोकळा...
महायुतीकडून माजी आमदार शशिकांत खेडेकर पुन्हा एकदा इच्छुक आहेत..मात्र आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यामुळे त्यांचे घोडे अडले आहे. "आमच्या गद्दारांना तुम्ही घ्यायचे नाही, तुमच्या गद्दारांना आम्ही घेणार नाही" असे सूत्र उबाठा शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ठरल्याने आ.शशिकांत खेडेकरांसाठी महाविकास आघाडीचे दरवाजे देखील बंद आहेत. त्यामुळे डॉ.राजेंद्र शिंगणे यांची लवकरात लवकर घरवापसी व्हावी हे खुद्द डॉ.शशिकांत खेडेकरांनाही वाटत असावे..कारण तसे झाले तरच डॉ.शशिकांत खेडेकरांसह महायुतीच्या अन्य इच्छुकांचा मार्ग मोकळा होऊ शकतो..
महाविकास आघाडीच्या इच्छुकांचाही गोंधळ...
लोकसभा निवडणुकीत समाधानकारक निकाल लागल्याने महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवण्यास इच्छुकांची गर्दी आहे. जागावाटपात हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे मतदारसंघातील अनेक इच्छुकांनी शरद पवारांची भेट घेऊन मुलाखती दिल्या आहेत. मात्र डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे संकेत महाविकास आघाडीत परतण्याचे दिसत असल्याने सगळ्या इच्छुकांचा गोंधळ उडाला आहे..गायत्री शिंगणे डॉ.राजेंद्र शिंगणे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत असल्या तरी त्या तेवढ्या "सक्षम" उमेदवार नसल्याचा अनेक सर्वेक्षण संस्थांचा सर्व्हे आहे..डॉ.नरेश बोडखे, दिनेश गीते, दिलीप वाघ हे देखील महाविकास आघाडी कडून इच्छुक आहेत, मात्र डॉ.राजेंद्र शिंगणेंच्या "लेट - कट" मुळे सगळेच गोंधळात आहे...