खरात तुमच्या शिक्षणाच्या समाजाला काय फायदा? तुम्ही फक्त उच्चशिक्षित, आ. संजय रायमुलकर खऱ्या अर्थाने "सुशिक्षित"!

 शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.बळीराम मापारींचा हल्लाबोल;म्हणाले, एवढी पदे भोगली, लोकांना काय दिलं...

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. खरात उच्चशिक्षित असून त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले असल्याची पोस्ट समाज माध्यमांवर त्यांच्या समर्थकांकडून टाकण्यात येत आहे. दरम्यान आता यावर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांनी टिप्पणी केली आहे. सिद्धार्थ खरात फक्त उच्चशिक्षित आहेत मात्र महायुतीचे उमेदवार आ. संजय रायमुलकर खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि सुसंस्कारीत आहेत असे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांनी म्हटले आहे. माध्यमांशी संवाद साधताना बळीराम मापारी बोलत होते...

पुढे बोलतांना बळीराम मापारी म्हणाले की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अनेक मंत्र्यांकडे पीए म्हणून काम केले. मंत्रालयात वेगवेगळी पदे भोगली.मात्र मेहकर विधानसभा मतदारसंघाचे सोडा त्यांच्या गावातल्या लोकांसाठी तरी त्यांनी काही केले का? याचे उत्तर खरात यांनी द्यावे असा टोला बळीराम मापारी लगावला आहे. उच्चशिक्षित असणे आणि सुशिक्षित असणे यात फरक आहे. शिक्षणाचा उपयोग समाजासाठी होत नसेल तर त्याचा फायदा तरी काय? खरात यांनी मंत्रालयात सेवा केली नाही तर पदे भोगली आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील जनतेला, मेहकर विधानसभा मतदारसंघातील जनतेला, सिंदखेड राजा तालुक्यातील त्यांच्या गावाला खरात यांच्या पदांचा काय फायदा झाला? त्यानी कुठल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य दिले? असा सवाल करीत आतापर्यंत शासकीय सेवेतून त्यांनी केवळ मेवा गोळा करण्याचे काम केल्याचेही प्रा. मापारी यांनी म्हटले आहे. याउलट आ. संजय रायमुलकर यांनी आमदारकीच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात अतिशय विनम्रपणे इथल्या जनतेची सेवा केल्याचे बळीराम मापारी म्हणाले. लोक भूलथापांना बळी पडणार नाहीत. इथल्या जनतेला सुखदुःखात साथ देणारा, विकासाभिमुख व्हिजन असणारा 
आमदार पाहिजे त्यामुळे आ. संजय रायमुलकर यावेळी पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयाचा चौकार ठोकतील असा विश्वासही प्रा.बळीराम मापारी यांनी बोलून दाखवला...