मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही !
बुलडाण्याच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला शब्द; म्हणाले, ज्यांनी मराठा समाजाचा गळा घोटला तेच तिथं जाऊन गळा काढत आहे! बुलडाणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळाला ६१८ कोटींचा लाभ; तगड्या पोलीस बंदोबस्तात पार पडला कार्यक्रम! खासदार प्रतापराव जाधवांनी मांडले जिल्ह्याचे प्रश्न
Sep 3, 2023, 18:09 IST
बुलडाणा (कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपल्या महायुती सरकारंन मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकल, मात्र महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवू शकल नाही . ज्यांनी आतापर्यंत मराठा समाजाचा गळा घोटला तेच आता "तिथं" जाऊन गळा काढत आहेत. अशा शब्दात विरोधकांवर हल्ला करून मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. बुलडाण्यातील कऱ्हाळे ले आऊट मध्ये पार पडलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन , संदीपान भुमरे, खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय रायमुलकर यांच्यासह विभागीय आयुक्त निधी पाण्डेय, पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जालना जिल्ह्यात झालेली घटना दुर्दैवी आहे. मला या घटनेमुळे खूप दुःख झाले. मराठा समाज अतिशय संयमी आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी आतापर्यंत शांततेत आंदोलने केले. मात्र जालना जिल्ह्यात शांततेत चाललेल्या आंदोलनात कुणी दगडफेक केली याचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले. या घटनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. मराठा समाजाच्या मूक मोर्चाला कुणी मुका मोर्चा म्हटल हे जनता विसरलेली नाही. मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयात टिकणारं आरक्षण दिल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जालन्यात झालेल्या घटनेची सखोल चौकशी केल्या जाईल, जालन्याच्या एसपींना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. तिथल्या दोन्ही अप्पर पोलीस अधीक्षकांना जिल्ह्याबाहेर पाठविनार आहे. वरिष्ठ अधिकारी या घटनेची चौकशी करतील..या प्रकरणात दोषी असलेल्याचे निलंबन करू..मात्र मयतांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या विरोधकांना बळी पडू नका असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले..
आमचं सरकार फेव्हिकॉलची जोड!
देवेंद्र फडणवीस लेह लडाख येथे सैनिकांच्या कार्यक्रमासाठी गेले आहेत, तर अजित पवारांची तब्येत बरी नसल्याने ते आजच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. आता पत्रकार म्हणतील की त्यांनी दांडी मारली..मात्र तसे काही नाही, आमचे सरकार फेव्हीकॉल सारखे मजबूत आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत राज्यभरात आतापर्यंत १ कोटी ६१ लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. यापूर्वी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत होते. सरकारी योजनांचा लाभ मिळवतांना लोक थकून कंटाळून जात होते शेवटी नाद सोडत होते.. एकाच छताखाली योजनांचा लाभ देणार हे देशातील पहिले सरकार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. हे पुण्याचं काम हे सर्वसामान्यांच सरकार करीत आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आतापर्यंत जेवढ्या कॅबिनेट बैठका झाल्या त्यात सर्व लोकहिताचे निर्णय घेतले. कोणताही निर्णय कुणाच्या व्यक्तिगत भल्यासाठी घेतला नाही. रस्त्यावर उतरून काम करणार हे सरकार आहे,फेसबुक लाइव्ह करून काम करणार सरकार नाही असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. बुलडाणा नदीजोड प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुकूल आहेत असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.कार्यक्रमाच्या प्रारंभी
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ६१८ कोटींच्या लाभांचे वितरण करण्यात आले.
शेगावला विमानतळ व्हावं - पालकमंत्री गुलाबराव पाटील
शिर्डीला ज्या प्रकारे विमानतळ झालं त्याच पद्धतीने संत नगरी शेगावात विमानतळ व्हावं, जिल्ह्यात किडणीच्या आजारांवर निदान करणारे हॉस्पिटल व्हावं,सिंदखेडराजा लोणारच्या विकासाच्या केवळ घोषणा झाल्या मात्र आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेऊन अंमलबजावणीकडे लक्ष द्यावी अशी मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी त्यांच्या भाषणातून केली. मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करीत आम्ही आरक्षण दिलं हायकोर्टात टीकवल पण तुमच्या सरकारच्या कार्यकाळात ते घालवलं अशा शब्दात विरोधकांवर हल्ला चढवला.
तर जिल्हा सुजलाम सुफलाम होईल - खासदार प्रतापराव जाधव
आज कार्यक्रम होईल की नाही अशा अफवा विरोधकांकडून पसरवल्या जात होत्या, मात्र बुलडाणा जिल्ह्यातील जनतेचा विश्वास मुख्यमंत्र्यांच्या कर्तुत्वावर असल्याचे आज उपस्थित गर्दीने सिद्ध झाल्याचे खासदार जाधव यावेळी म्हणाले. बुलडाणा जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प गरजेचा आहे. त्यासाठी वैनगंगा , पैनगंगा, नळगंगा या नद्याच्या सर्वेक्षणाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत. नदीजोड प्रकल्प झाला तर जिल्हा सुजलाम सुफलाम होईल असे खासदार प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले. खामगाव जालना रेल्वेमार्गासाठी ५० टक्के खर्च उचलण्याचे जाहीर केले मात्र केंद्र सरकारला राज्य सरकारचे अजून तसे पत्र पोहचले नाही, ते पत्र लवकर केंद्र सरकारला देण्यात यावे अशी मागणी खा.जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. लोणार, सिंदखेडराजा येथील विकास आराखडे तयार आहेत, सरकारने निधीही दिला आहे पण आपल्या स्थरावर बैठक बोलावून त्याची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे खासदार जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. आमदार संजय गायकवाड यांचेही यावेळी भाषण झाले. आभार प्रदर्शन दिनेश गीते यांनी केले.