'वर्षाअखेर वेगळा विदर्भ मिळवूच' वामनराव चटप यांचा बुलडाण्यात निर्धार; म्हणाले, २७ डिसेंबरपासून करणार विदर्भव्यापी आंदोलन ....

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सातत्याने  मांडणारे माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांनी काल बुलडाण्यात त्यांचा निर्धार बोलून दाखविला. '३१ डिसेंबरपूर्वी " करू वा मरू पण विदर्भ राज्य मिळवून राहूच"असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच २७ डिसेंबर पासून  विदर्भव्यापी आंदोलनाची घोषणा करून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आपल्या मागणीसाठी नव्याने रणशिंग फुंकले

 स्थानिक शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील  विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी पुढील आंदोलनावर विचारविनिमय करण्यात आला. 

  त्यांनतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पुढील आंदोलनाची माहिती दिली.  अकोला जिल्ह्यात २० डिसेंबरला पश्चिम विदर्भ स्तरीय 'विदर्भ निर्माण संकल्प मेळावा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप येथे दुपारी १ ते ५ वाजेदरम्यान हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उपोषण आणि रस्ता रोको आंदोलन..
 
त्यानंतर २७ तारखेपासून नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे. या मध्ये वामनराव चटप, महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना मामर्डे,  पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, ऍड वीरेंद्र जैस्वाल यांचेसह विदर्भातील प्रमुख सहकारी सहभागी होणार आहे. बुलडाण्यात राम बारोटे, तेजराव मुंडे, सुरेश वानखेडे, दामोदर शर्मा, कैलास फाटे ,प्रकाश अवसरमोल हे  उपोषण करणार आहे. या आंदोलनाला पाठींबा म्हणून  विदर्भातील ११ जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे ऍड चटप यांनी सांगितले. केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, विदर्भात येऊ घातलेले २ औष्णिक प्रकल्प विदर्भा बाहेर न्यावे, वीज दरवाढ व कृषी पंपा साठी असलेले दिवसाचे लोडशेडिंग रद्द करावे आदी  १० मागण्यासाठी हे विदर्भ व्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे चटप म्हणाले. यावेळी रमाकांत महाले,  श्याम अवथळे,  सुभाष विणकर, भास्कर लहाने, प्रकाश इंगळे आदी उपस्थित होते.