एकाधिकारशाही संपवण्यासाठी एकदिलाने पुढे येण्याची गरज! जयश्रीताई शेळकेंचे प्रतिपादन! 
गावोगावी प्रचाराचा झंझावात! नांद्राकोळी गावात तुफान गर्दी...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी एक दिलाने पुढे येण्याची गरज आहे. बुलढाणा मतदारसंघातील गुंडगिरीचा धुडगूस, एकाधिकारशाही संपवण्याची योग्य वेळ आली आहे. यासाठी सज्ज होण्याचे आवाहन जयश्रीताई शेळके यांनी नांद्राकोळी येथे केले. आज मतदारसंघातील विविध गावांमध्ये त्यांनी भेटी दिल्या. यावेळी जनसामान्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जयश्रीताई शेळके यांच्या प्रचाराचा झंझावात निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या  उमेदवार जयश्रीताई सुनील शेळके यांना गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत आहे. रॅली, सभा, बैठकांना गर्दी होत असून यंदा परिवर्तन करायचेच, अशा भावना जनसामान्यांच्या आहे.

५ नोव्हेंबर रोजी हनवतखेड, सुंदरखेड, माळविहीर, सावळा, पोखरी, भादोला, वाडी, पिंपरखेड, वरवंड , डोंगरखंडाळा, खेर्डी, रुईखेड टेकाळे, खुपगाव, सव, येळगाव, अजिसपूर, नांद्राकोळी, सागवन, कोलवड, तांदुळवाडी, हतेडी खु, हतेडी बु., झरी, अंभोडा या गावात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई सुनिल शेळके यांच्या प्रचारार्थ प्रत्येक गावातील नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला. महामानवांना अभिवादन करुन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेत जयश्रीताईंनी सर्वांशी संवाद साधला. याप्रसंगी उबाठाचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, प्रा. डी. एस. लहाने, गणेशसिंग राजपूत, लखन गाडेकर, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांच्यासह महाविकास आचाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

  येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपणास गुंडशाही आणि दडपशाहीला पराभूत करायचे आहे. भयमुक्त तसेच भ्रष्टाचारमुक्त मतदारसंघ आपल्याला करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. कुण्या एकट्याने हे काम होणार नाही. एकजुटीची ताकद काय असते हे आपल्याला दाखवून द्यायचे आहे. परिवर्तनाच्या लढाईसाठी सर्जजण सज्ज व्हा, असे आवाहन जयश्रीताई शेळके यांनी केले. नांद्राकोळी येथे आयोजित प्रचाररॅलीत त्या बोलत होत्या. गावकऱ्यांनी केलेल्या स्वागताबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले. यावेळी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच वाल्मीक ऋषी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  याप्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.