मते मागण्यासाठी आमच्याकडे विकासाचा मुद्दा! आ. संजय गायकवाड यांचे प्रतिपादन; म्हणाले, विरोधकांकडे मुद्देच नाहीत! रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होण्याचा विश्वास... 

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास करण्याचे काम गेल्या पाच वर्षात प्रामाणिकपणाने केले. त्यामुळे ही निवडणूक आमच्यासमोर काही आव्हान घेऊन आलेली नाही. मतदार संघातील जनतेने विकासाचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे विकास याच एकमेव मुद्द्यावर आम्ही मतदारांसमोर जात आहोत असे प्रतिपादन बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार धर्मवीर संजय गायकवाड यांनी केले. आज,१४ नोव्हेंबरला आ. संजय गायकवाड यांचा प्रचार दौरा मोताळा तालुक्यातील ब्राम्हदा गावात पार पडला यावेळी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 
 पुढे बोलतांना आ.गायकवाड म्हणाले की, या निवडणुकीत विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत. विकास म्हणजे काय असते हे आम्ही गेल्या पाच वर्षात दाखवून दिले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, पैनगंगा नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्प यासह विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी भरभरून निधी मिळाला आहे. विकास कामे करताना घाटावर आणि घाटाखाली असा भेद मी कधीही केला नाही असेही आ.गायकवाड म्हणाले. बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी ही निवडणूक ऐतिहासिक अशी असणार आहे. सामान्य जनतेचे भरभरून प्रेम मला मिळत आहे. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होईल ही खात्री असल्याचेही आ.गायकवाड म्हणाले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...