आम्ही केलेल्या कामांच्या भरवशावर मते मागतो! आमदार डॉ.संजय रायमुलकरांचे प्रतिपादन! म्हणाले, विरोधकांकडे मुद्दे नाहीत..

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर- लोणार मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात हजारो कोटी रुपयांचा निधी आम्ही मंजूर करून आणला. यातील बहुतांश कामे झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. मतदार संघातील एकही गाव असे नाही ज्या गावात विकास कामे झाली नाहीत. विकास कामे करताना मी कधीही जात-पात धर्मपंथ याचा विचार केला नाही. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक आमच्यासाठी काही आव्हान नाही.. केलेल्या कामांच्या भरवशावरच आम्ही मतदारांसमोर जात आहोत.. याउलट विरोधकांकडे मात्र कोणतेही मुद्दे नाहीत, काही विरोधकांना तर मतदार संघाची माहिती सुद्धा नाही.. मतदार संघात किती गावे आहेत हे सुध्दा माहिती नाही..त्यामुळे आधीच्या निवडणुका जशा झाल्या त्याहीपेक्षा रेकॉर्ड मतांनी जनता आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहे असा विश्वास मेहकर लोणार मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.संजय रायमुलकर यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना व्यक्त केला.
लोणार विकास आराखड्यासाठी ४३४ कोटी रुपयांच्या निधी मंजूर करून आणला आहे.त्यामुळे लोणार शहरातील पुरातन मंदिरे सांडपाणी प्रक्रिया व भूमिगत गटारे, शहरातील पाणीपुरवठा योजना, प्रयोगशाळा व पर्यटन माहिती केंद्र, तारांगण व संग्रहालय यासारखी पर्यटनाच्या दृष्टीने व वैज्ञानिकांना आवश्यक अशी कामे सुरू करण्यात आल्याचे आ. रायमुलकर यांनी सांगितले. मेकर शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून ७४ कोटी व अमृत योजनेतून ३८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त करून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे. याशिवाय मेहकर शहराच्या रस्ते विकासासाठी ९० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्याचीही कामे प्रगतीपथावर असल्याचे आ. रायमुलकर म्हणाले. अशी शेकडो कामे आम्ही केली आहेत, ग्रामीण भागात देखील विकासाची गंगा पोहोचवली आहे. रस्ते, पाणीपुरवठा योजना ,आरोग्य, शेतकरी अशा विविध मुद्द्यांवर हजारो कोटी रुपयांची कामे झाली असल्याने विजयाचा विश्वास असल्याचे आ. रायमुलकर म्हणाले. विरोधक खोट्या भुलथापा देत आहेत, मात्र मेहकर लोणार मधील जनता हुशार आहे..अडचणीच्या वेळी कोण मदतीला धावतो जे इथल्या जनतेला माहित आहे असेही ते म्हणाले.