भय आणि भ्रष्टाचार मुक्त बुलडाणासाठी मतदान करा!
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जयश्रीताईंचे आवाहन...
Nov 14, 2024, 14:38 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज,१४ नोव्हेंबर पासून पुढील तीन दिवस शासकीय कर्मचारी जे निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करत आहेत. त्यांच्यासाठी मतदानाची प्रक्रिया मत पत्रिकेतून पार पडणार आहे. त्यामुळे शांतता प्रिय बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी कर्मचारी बांधवांनी देखील मशाल या चिन्हाला मत पसंती द्यावी असे आवाहन बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी एका व्हिडिओद्वारे केले आहे.
प्रचार आता अंतिम टप्प्याकडे जात आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत. त्यामुळे सोशल माध्यमाचा देखील पुरेपूर वापर करण्यात येत आहे. अर्थात ट्रोलिंग सारखे खालच्या पातळीवरचे प्रकार देखील सोशल माध्यमातून दिसून येत आहेत. दुसरीकडे उमेदवार या सोशल माध्यमातून मतदारांपुढे आपलं म्हणणं मांडताना दिसत आहेत. जयश्रीताई शेळके यांनी देखील आज एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना विनंती वजा आवाहन केले आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघ हा शांतताप्रिय आणि संयमी मतदारसंघ म्हणून ओळखल्या जातो. शासकीय कर्मचारी शासनाच्या विविध योजना समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम पोटतिडकिने करत असतात. आजपासून त्यांच्यासाठी पुढील तीन दिवस मत पत्रिकेद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे कर्मचारी बांधवांचे मतदान सुद्धा हे अतिशय महत्त्वाचे आहे. शांतता प्रिय व भयमुक्त , सुसंस्कृत मतदार संघासाठी कर्मचारी बांधवांनी मतपत्रिकेवरील मशाल चिन्हाला पसंती द्यावी असे आवाहन जयश्रीताई शेळके यांनी केले आहे.