बोरी आडगाव येथे वन बुलडाणा मिशनचा संवाद मेळावा संपन्न! संदीप शेळके म्हणाले,परिवर्तनाच्या चळवळीत भरीव योगदान द्या! जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून देऊ..
Oct 16, 2023, 18:05 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):वन बुलढाणा मिशन ही जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास असलेली लोकचळवळ आहे. यामाध्यमातून जिल्ह्याचे मागासलेपण दूर करायचे आहे. विकासात जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी काम करायचे आहे. बोरी आडगाव गावाने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठे काम उभे केले आहे. परिवर्तनाच्या चळवळीत सुद्धा या भूमीने भरीव योगदान द्यावे, असे आवाहन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले.
जाहीरनामा जनतेचा कार्यक्रमा अंतर्गत शनिवारी बोरी आडगाव येथे संवाद सभा झाली. यावेळी ते बोलत होते. मंचावर बाजार समितीचे उपसभापती रावसाहेब पाटील, सरपंच सदाभाऊ वाघमारे, उपसरपंच एजाजभाई, सिमाताई पाटील, उस्मान भाई, डॉ. आकाश इंगळे, भरत सुरताळे, किशोर पाटील, सदाशिवराव जुमडे, हरूनभाई, पंजाबराव देशमुख, देवानंद पाटील, दत्तात्रय जाधव, प्रीतिताई जाधव, राजाभाऊ टिकार यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असल्याशिवाय हे प्रश्न निकाली निघू शकत नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर खामगाव- जालना मार्गाचा विषय पुढे येतो. त्यानंतर पुन्हा हा विषय मागे पडतो. असे अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र आता राजकीय भूलथापांना जनता बळी पडणार नाही.
जिल्ह्यात चांगल्या एमआयडीसी उभ्या राहिल्या पाहिजेत. तसे झाल्यास युवकांच्या हाताला काम मिळेल. युवक स्वावलंबी होतील. बोरी आडगावचे भविष्यात बुट्टीबोरी का होऊ शकत नाही? नक्कीच होऊ शकते, याकरिता सामुहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जुने वैभव परत मिळवू
खामगाव हा कापूस बेल्ट आहे. या भागातील शेतकरी पांढरे सोने पिकवतो. खामगावला सिल्व्हर सिटी म्हणतात. वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड असे म्हटले जाते. ही देशातील एक नंबरची कापसाची बाजारपेठ होती. सुवर्णकाळ अनुभवलेला आपला जिल्हा आहे. जिल्ह्याचे वैभव आपणास परत मिळवायचे आहे. याकरिता सर्वांनी मिळून काम करुया, असे संदीप शेळके म्हणाले.
प्रोसेसिंग युनिट उभे राहावे
खामगाव तालुक्यात कापसाचे प्रचंड उत्पादन होते. मात्र कापसावर प्रक्रिया करणारा एकही उद्योग इथे नाही. केळीचे तसेच आहे. या भागात दरवर्षी केळीची लागवड केली जाते. परंतु केळीवर प्रक्रिया करणारे युनिट नाही. तसेच संत्रा, आवळा, सोयाबीन, मका या पिकांवर प्रक्रिया करणारे प्रोजेक्ट सुरु केल्यास अर्थव्यवस्था सुधारेल. रोजगार निर्माण होईल. येणाऱ्या काळात यादृष्टीने विचार करण्याची गरज असल्याचे संदीप शेळके म्हणाले.