वन बुलडाणा मिशनचा २६ नोव्हेंबरला बूथ कमिटी मेळावा! लोकसभेच्या तयारीला वेग ;संदीप शेळकेंचा विश्वास, म्हणाले
माझा बूथ अजिंक्य ठरणार, मताधिक्य निश्चित करणार...
Nov 24, 2023, 16:32 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलढाणा मिशनचा बूथ कमिटी मेळावा २६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. बुलडाणा येथील निवांत लॉन्स (अजिंठा रोड) येथे सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या संदीप शेळकेंनी निवडणुकीची जोमात तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. माझा बूथ अजिंक्य ठरणार, मताधिक्य निश्चित करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बुलडाणा जिल्हा विकासात अव्वल स्थानावर आणण्याच्या उद्देशाने वन बुलडाणा मिशन ही लोकचळवळ कार्यरत आहे. जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी रोजगार, सिंचन, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. आपली ध्येयधोरणे जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी संवाद मेळाव्याच्या माध्यमातून संदीप शेळके गावोगावी सभा घेत आहेत. आतापर्यंतच्या सर्वच सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जनमत विकासाच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने बूथ कमिट्यांना खूप महत्व आहे. सर्वच पक्ष आता लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. आता वन बुलडाणा मिशन बूथ कमिटीच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत आपला विचार पोहचवणार आहे. गाव तिथे बूथ कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. याद्वारे एकजुटीची मोट बांधण्यात येणार आहे.
जनतेच्या प्रतिसादाने ऊर्जा मिळते
कोणताही राजकीय पक्ष पाठीशी नसतांना वन बुलडाणा मिशनची जोरदार घोडदौड सुरु आहे. पंढरपूर पायदळ वारी, शेगाव पायदळ वारी, बुलडाणा ते चिखली परिवर्तन पदयात्रेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी दोन शक्तीपीठांना साकडे घालण्यात आले. जिल्हाभर संवाद मेळावे घेण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या विकासाबाबत जनतेची मते जाणून घेतली जात आहेत. यामधून जनतेचा जाहीरनामा मांडण्यात येणार आहे. संवाद मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता जिल्हावासी परिवर्तनाच्या सोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जनतेचे प्रेम आणि प्रतिसाद यामुळे आपण वन बुलडाणा मिशनची भूमिका घेऊन जिल्हाभर जातो आहे. खरं तर ही जनतेची ऊर्जा आहे, अशी कबुली संदीप शेळकेंनी दिली.