केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव आता विधानसभा मोडवर! जळगांव जामोदला महायुतीच्या मेळाव्यात म्हणाले,विधानसभेत पुन्हा महायुतीला निवडून द्या, हे सर्वसामान्यांचे सरकार!

लाडक्या बहिणींनी ना.जाधवांना बांधली राखी...

 

जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्र आणि राज्यातील सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. केंद्र सरकारने १० वर्षात जेवढी कामे केली तेवढी काँग्रेसला सत्तेच्या ५० वर्षात करता आली नाही. शेतकरी,शेतमजूर आणि गोरगरिबांच्या हिताच्या योजना केंद्र आणि राज्यातील महायुतीचे सरकार राबवत आहे. केंद्रात पुन्हा एकदा देशातील जनतेने कार्यतत्पर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीलाच विजयी करण्याचा संकल्प करा, बुलडाणा लोकसभेतील सहापैकी सहाही विधानसभेवर महायुतीचेच आमदार विजयी झाले पाहिजेत त्यासाठी झटून कामाला लागा असे आवाहन केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव यांनी केले. काल, १५ ऑगस्ट रोजी वरवट बकाल आणि जळगाव जामोद येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच ना. प्रतापराव जाधव यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, यावेळी सरकारला उत्तर देताना ते बोलत होते.आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, राष्ट्रवादीचे रंगराव देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात केल्याबद्दल महिलांनी ना.जाधव यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान यावेळी पुढं बोलतांना ना .जाधव म्हणाले की, राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाडकी बहिण योजना हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत स्री - पुरुष समानतेच्या केवळ गप्पा मारल्या जात होत्या मात्र महायुती सरकारने प्रत्यक्ष कृतिरुप अंमलबजावणी केल्याचे ते म्हणाले. १० वर्षाआधी देशाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याची तुलना केली तर सर्व चित्र आपल्या डोळ्यासमोर येईल असे ना.जाधव म्हणाले. जळगाव जामोद विधानसभेने सलग चौथ्यांदा सर्वाधिक लीड दिल्याबद्दल ना.जाधव यांनी आभार मानले. तुमच्यामुळेच सामान्य शेतकऱ्याचा मुलगा चौथ्यांदा देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोहचल्याचे ना.जाधव म्हणाले.
   
आता महिन्या - दोन महिन्यात विधानसभा निवडणुका लागतील. विरोधक खोटा प्रचार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवून कामातून त्यांना उत्तर द्या. विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचाच विजय होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे,त्यात बुलडाणा लोकसभेचे सहाही आमदार महायुतीचेच असतील असेही ना.जाधव म्हणाले.