केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव उद्या जिल्ह्यात मुक्कामी! लोकसभेच्या तयारीला वेग, भाजपचे नेते करणार लोकसभेचा उमेदवार बदलण्याची मागणी? काय आहे "अंदर की बात"....

 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. इतर पक्षांच्या तुलनेत भाजपने निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव गेल्या वर्षभरात आतापर्यंत ४ वेळा जिल्ह्यात येऊन गेले..उद्या, ६ जानेवारीच्या मुहूर्तावर ते पुन्हा जिल्ह्यात येणार आहेत..कागदोपत्री त्यांचा हा दौरा शासकीय दिसत असला तरी या दौऱ्यात बऱ्याच राजकीय घडामोडी होण्याची चिन्हे आहेत..विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील भाजपचे काही नेते आणि कार्यकर्ते भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन बुलडाणा लोकसभेचा उमेदवार बदलण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत एकेका मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. त्यात बुलडाणा लोकसभेची जबाबदारी निवडणुकीच्या रणनीतीसाठी माहीर असलेल्या भूपेंद्र यादवांकडे आहे. यादव याआधी ४ वेळा जिल्ह्यात येऊन गेलेत. केंद्राच्या योजनांची नीट अंमलबजावणी होते का हे पाहण्याचे काम या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत करायचे असते असे भाजपकडून सांगितल्या जात असले तरी आगामी निवडणुकीची तयारी हाच छुपा अजेंडा यामागे आहे ही बाब लपून राहिलेली नाही. बुलडाणा लोकसभा मतदार संघावर आता भाजपची चांगलीच नजर आहे, त्यासाठी भाजपने अडीच वर्षाआधीच कंबर कसली होती.त्यावेळी शिवसेना महाविकास आघाडीत होती,मात्र वर्षभरापूर्वी राजकीय उलथापालथ होऊन शिवसेनेचे विभाजन झाले. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पाहून खा.जाधव यांनी भाजपसोबत असलेल्या एकनाथ शिंदेंची साथ धरली.तेव्हापासून भाजपने उघडपणे बुलडाणा लोकसभेच्या जागेबाबत भाष्य केले नसले तरी "अंदर की बात" भाजपच्या सगळ्याच नेत्यांना माहीत आहे.
   भूपेंद्र यादव यांच्या याआधीच्या प्रवासात देखील भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी खा.प्रतापराव जाधव यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. लोकसभेचा उमेदवार बदलला तरच जमेल असा मॅसेज भाजपच्या नेत्यांनी भूपेंद्र यादव यांच्यामार्फत दिल्लीदरबारी पोहचवला आहे. भाजपडून बुलडाणा लोकसभा मतदारसंघात करण्यात आलेला सर्वे देखील खा.प्रतापराव जाधव यांच्यासाठी अनुकूल नाही.खुद्द बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनीच तशी कबुली दिल्याने खा.जाधव यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
या सगळ्या पार्श्वभुमीवर उद्या होणाऱ्या भूपेंद्र यादव यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भूपेंद्र यादव यांचा हा शेवटचा दौरा असण्याची शक्यता आहे.. या ५ दौऱ्यात पाहिलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा "आखो देखा हाल" भूपेंद्र यादव यांच्याकडून भाजपच्या निवडणूक विभागातील चाणक्यांना ऐकवल्या जाईल..त्यांनंतर बुलडाणा लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपकडून आवश्यक त्या रणनीतीचा अवलंब केल्या जाऊ शकतो...अर्थात पुढे काय होईल याचा काही नेम नाही..कारण हे राजकारण आहे भाऊ....
असा आहे दौरा..
  केंद्रीय श्रम, रोजगार, वन, पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांचे उद्या शनिवार (दि.6) रोजी छत्रपती संभाजीनगर येथून देऊळगाव राजा तालुक्यातील आनंदगड येथे सकाळी ९:४० वाजता आगमन होईल. ते सकाळी १० वाजता सिनगाव जहागीर येथे आगमन होईल. त्यानंतर श्री. देविदास महाराज संस्थान येथे सकाळी १०.३० वाजता आयोजित ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. 
त्यानंतर दुपारी १२.३० वाजता तृप्ती लॉन्स, धोत्रा नांदई फाटा येथे आगमन व राखीव. धोत्रा नांदई फाटा येथून दुपारी १ वाजता खामगाव तालुक्यातील जनुनाकडे प्रयाण करतील. केंद्रीय मंत्री श्री. यादव यांच्या हस्ते दुपारी २.४५ वाजता जनुना येथील अटल आनंदवन घन वन योजनेंतर्गंत वृक्षारोपण होणार आहे . खामगाव येथील वन परीक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालयाचे दुपारी ३ वाजता त्यांच्या हस्ते लोकार्पण होईल. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता जिल्हा परिषद मुलींची शाळा येथील आयोजित ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता गजानन महाराज परिसर येथे आगमन होईल. शेगाव येथे रात्री मुक्कामी असतील.    
 केंद्रीय मंत्री श्री. यादव हे रविवार (दि.७) रोजी सकाळी 
७.३० वाजता श्री. गजानन महाराजांचे दर्शन घेतील. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता शेगाव येथून बावनवीरकडे प्रयाण करतील. बावनवीर येथे आयोजित ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता संग्रामपूर येथील जलजीवन मिशनच्या प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. त्यानंतर जळगाव जामोद मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.