केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव चौथ्यांदा जिल्ह्यात ! काय आहे भाजपचा प्लॅन?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय कामगार, रोजगार आणि पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हे आज शनिवार (दि. १६) रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. याआधी ते मागील नऊ महिन्यात तीन वेळा जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले आहेत. 
केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माहितीचा प्रचार व प्रसिद्धी करणाऱ्या 'विकसित भारत संकल्प यात्रे'ला चिखली तालुक्यातील पेठ येथे ते भेट देणार आहेत. 
केंद्रीय मंत्री श्री. यादव यांचे छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी १:४५ वाजता चिखली येथे आगमन होईल व त्यांची वेळ राखीव असेल. त्यानंतर दुपारी २:३० वाजता गांधीनगर (चिखली) येथे आगमन व राखीव, चिखली तालुक्यातील पेठ येथे दुपारी ३:३० वाजता आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील.
 त्यानंतर सायंकाळी ५:३० वाजता पेठ येथून मोटारीने छत्रपती संभाजीनगरकडे ते प्रयाण करतील.
भाजपचा प्लॅन काय?
लोकसभा निवडणुका आता अगदी दोन महिन्यांवर आल्यात. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी रणनीती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वरिष्ठ पदाधिकारी, केंद्रीय मंत्री यांच्याकडे एका एका लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा. या मतदार संघाची जबाबदारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर आहे. लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत आतापर्यंत तीनदा ते जिल्ह्यात येऊन गेलेत. आज चौथ्यांदा येणार आहेत, त्यामुळे भाजपचा प्लॅन काय अशी चर्चा सुरू असून काहींची धाकधूक वाढली आहे.